नवी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. दोन दिवसांच्या छापेसत्रात कृत्रिमरीत्या पिकवलेले ११ लाख रुपयांहून अधिक किमतीचे आंबे आणि सुमारे साडेचार लाख रुपयांचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात ३७ जणांना अटक करण्यात आली असून ३१ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३० आणि ३१ मे रोजी एपीएमसी बाजारपेठेसह नवी मुंबई ठाणे परिसरात अचानक तपासणी मोहीम राबवली. उन्हाळ्यात आंब्यांची वाढलेली मागणी लक्षात घेता काही व्यापारी फळांवर थेट इथिलिनसदृश स्प्रे फवारून ती कृत्रिमरीत्या पिकवत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार फळ मार्केटमधील एक्सपोर्ट हाऊससह विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. तपासणीत अशा प्रकारे आंबे पिकवणाऱ्या तीन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ३,४५३ किलो आंबे जप्त करण्यात आले. त्यांची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये इतकी आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रेचा वापर करण्यास बंदी आहे. फळे पिकवण्यासाठी केवळ मान्यताप्राप्त इथिलिन गॅस चेंबरचा वापर करण्याची परवानगी आहे. जप्त करण्यात आलेल्या आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार आहे.

विशेष म्हणजे ज्या एक्सपोर्ट हाऊसमध्ये ही कारवाई करण्यात आली, तेथून मध्यपूर्व, युरोप आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबे, फळे आणि भाजीपाल्याची निर्यात केली जाते. एपीएमसीतील ही इमारत निर्यात व्यवसायासाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या कारवाईमुळे निर्यातीसाठी हाताळल्या जाणाऱ्या फळांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित झाले असून व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मे या कालावधीत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधातही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ३६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. एकूण ४ लाख ७४ हजार ४०७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एपीएमसीसारख्या राज्यातील प्रमुख घाऊक बाजारपेठेत सुरू असलेल्या गैरप्रकारांवर थेट कारवाई झाल्याने व्यापारी वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. बाजारातील काही घटकांनी अशा तपासण्या नियमितपणे राबवून भेसळखोर आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या गैरप्रकारांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक

भेसळयुक्त अथवा प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत तक्रार नोंदविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांना लेखी तक्रारही नोंदविता येणार असून अशा गैरप्रकारांविरोधात पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो, काही व्यापाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी कृत्रिमरीत्या आंबे पिकवण्याचे प्रकार सुरूच होते. त्यांच्यावर कारवाई झाल्याने इतर व्यापाऱ्यांनाही हा गंभीर इशारा मिळाला आहे. अशा कारवाया वारंवार होणे गरजेचे आहे.-संजय पानसरे, आंबा व्यापारी, एपीएमसी