नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मुख कर्करोग पूर्वतपासणी शिबिरातून धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या वेळी तपासणी करण्यात आलेल्या ३८९ जणांपैकी ७५ जणांमध्ये मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आढळून आली. त्यापैकी २१ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने ‘बायोप्सी’ चाचणीसाठी संदर्भित करण्यात आले. या आकडेवारीमुळे एपीएमसी परिसरात तंबाखू आणि गुटखा सेवनाचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एपीएमसी सचिव शरद जरे यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. टाटा मेमोरियल सेंटर आणि वर्ल्ड ॲग्रो केअर फाउंडेशन यांनी मसाला आणि फळ बाजारात ही तपासणी केली. तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांचे लवकर निदान आणि जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
शिबिरातील निष्कर्षांवरून एपीएमसी परिसरात काम करणारे माथाडी कामगार, मापाडी, सफाई कर्मचारी आणि व्यापाऱ्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे स्पष्ट झाले. मात्र, बाजार आवारातील मोठ्या गर्दीच्या तुलनेत तपासणी शिबिराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत वैद्यकीय पथकाने व्यक्त केली. पानटपऱ्यांवर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ खरेदीसाठी मोठ्या रांगा दिसत असताना आरोग्य तपासणीबाबत मात्र अनास्था दिसून आल्याचे निरीक्षण वैद्यकीय पथकाकडून व्यक्त करण्यात आले.
तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री
एपीएमसीच्या पाच प्रमुख बाजार विभागांमध्ये शंभरहून अधिक पानटपऱ्या सुरू असून त्यापैकी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप बाजार घटक करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून अनेकदा कारवाई करून काही टपऱ्या बंद केल्या जात असल्या तरी काही महिन्यांतच त्या पुन्हा सुरू होतात. त्यामुळे ठोस कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
माथाडी कामगार आणि इतर बाजार घटकांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण गंभीर बाब आहे. भविष्यात त्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू नये म्हणून वेळीच निदान करण्यासाठी हे तपासणी शिबीर घेण्यात आले.
- डॉ. अजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मुंबई एपीएमसी
