नवी मुंबई : आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) प्रशासनाने केलेल्या नालेसफाईच्या दाव्यांचा फज्जा उडाला आहे. फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाला बाजार अशा पाचही बाजारांतील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार आणि ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, स्वच्छता आणि पाणी निचऱ्याच्या कामांवर भर दिल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत त्याचा परिणाम दिसून न आल्याने बाजारघटकांकडून कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एपीएमसीच्या मुख्यालयापासून विविध बाजार विभागांपर्यंत अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र गेल्या आठवडाभरापासून सातत्याने दिसत आहे.

काही ठिकाणी पाऊस थांबल्यानंतरही अनेक तास पाणी न ओसरल्याने बाजारातील व्यवहारांवर परिणाम होत आहे. व्यापाऱ्यांना गाळ्यांपर्यंत पोहोचणे, मालाची चढ-उतार करणे तसेच ग्राहकांना बाजारात ये-जा करणेही कठीण होत आहे. मालवाहू वाहनांची वाहतूक संथ झाल्याने सकाळच्या व्यवहारांवरही परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी एपीएमसी परिसराची पाहणी करून अस्वच्छता, तुंबलेले नाले आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आवश्यक सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर एपीएमसी प्रशासनाने नालेसफाई, तासागणिक कचऱ्याची उचल, अतिरिक्त मनुष्यबळ आणि पाणी निचऱ्यासाठी विशेष नियोजन केल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतरही बाजारातील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याचे दिसून येत आहे.