नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात साखरेचा दर अवघ्या पंधरवड्यात किलोमागे ४० रुपयांवरून ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पनीर आणि माव्याच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे मिठाई उत्पादकांचा उत्पादनखर्च वाढला असून, सध्याची दरवाढ कायम राहिल्यास ऐन सणासुदीच्या काळात मिठाईचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रक्षाबंधन २८ ऑगस्टला असल्याने मिठाई उत्पादकांकडून साखर, पनीर आणि माव्याची खरेदी वाढली आहे. साखरेची आवक तुलनेने कमी असताना मागणी वाढल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पंधरा दिवसांपूर्वी ४० रुपये किलो असलेली साखर आता घाऊक बाजारात ६० रुपयांवर पोहोचली आहे. किरकोळ बाजारातही दर ४६ रुपयांवरून ७२ रुपयांपर्यंत वाढली आहे.
वाशीच्या मुंबई एपीएमसीतील व्यापारी जय पटेल यांच्या माहितीनुसार, घरगुती ग्राहकांकडून साखरेची खरेदी मर्यादित असली तरी मिठाई उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे बाजारातील साखरेच्या दरांत वाढ झाली आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मागणी आणखी वाढल्यास दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
रक्षाबंधनानंतर गणेशोत्सव सुरू होणार असल्याने मिठाईची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून प्रसाद आणि मिठाईची खरेदी केली जाते. त्यामुळे साखर, पनीर आणि माव्याचे दर सध्याच्या पातळीवर कायम राहिल्यास किंवा आणखी वाढल्यास त्याचा परिणाम मिठाईच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे.
मिठाई विक्रेते प्रकाश सिरवी यांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या मालाच्या दरवाढीचा संपूर्ण भार सध्या ग्राहकांवर टाकण्यात आलेला नाही. मात्र साखर, पनीर आणि माव्याचे दर असेच वाढत राहिल्यास उत्पादनखर्च भागवण्यासाठी मिठाईच्या किमतीत वाढ करावी लागू शकते. त्यामुळे रक्षाबंधनासह आगामी सणांच्या काळात ग्राहकांना मिठाईसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
पनीरच्या दरवाढीमागे एफडीए
पनीरच्या बाजारातही सणासुदीच्या मागणीबरोबरच अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांचा परिणाम जाणवत आहे. दुग्धेतर अथवा ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि वितरणावर महाराष्ट्रात वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. एफडीएच्या तपासणीत ३०८ पनीर व दुग्धजन्य पर्यायांच्या नमुन्यांपैकी ७९ नमुने निकृष्ट, तर ३० नमुने असुरक्षित आढळले होते. त्यानंतर दर्जेदार दुग्धजन्य पनीरला मागणी वाढल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पनीरच्या दरातही वाढ झाली आहे. पूर्वी सुमारे ३०० रुपये किलो असलेले साधे पनीर आता ३८० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ३५० रुपये किलो असलेल्या मलाई पनीरचा दर ४६० रुपयांपर्यंत वाढला आहे. मिठाईच्या विविध प्रकारांमध्ये पनीरचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने या दरवाढीमुळे मिठाई तयार करण्याचा खर्च वाढला आहे.
माव्याच्या दरात शंभर रुपयांनी वाढ
मिठाई तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या माव्याच्या दरातही गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३५० रुपये किलो असलेला मावा यंदा ४५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. माव्याची उपलब्धता कमी झाल्याने दर वाढल्याचे डेअरी व्यावसायिक सांगतात. रक्षाबंधनासाठी पेढे, बर्फी, कलाकंद यांसह विविध दुग्धजन्य मिठाईंची मागणी वाढल्याने माव्याची खरेदीही वाढली आहे.
