मोरबेत गेल्या वर्षीपेक्षा ५ मीटर कमी पाणीसाठा ; १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच २७.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध

सध्या धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

morbe dam
(संग्रहित छायाचित्र)

धरण भरण्यासाठी सरासरी ४५०० मिमी पावसाची गरज

नवी मुंबई : पावसाने ओढ दिल्याने या वर्षी नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. धरण भरण्यासाठी धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी ४५०० मिमी पावसाची गरज भासणार आहे. सध्या धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी पाऊस झाल्याने धरण पातळीत वाढ होत आजच्या दिवशी ७५ मीटर पाणी पातळी होती. ती आता ५ मीटर कमी असून आता ७० मीटर पाणीपातळी आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास नवी मुंबई शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होता. हे धरण काही वर्षांचा अपवाद वगळता कायम पूर्ण क्षमतेने पूर्ण भरून वाहते. त्यामुळे शहराला कधीही पाणीटंचाई भासत नाही. २४ तास पाणीपुरवठा करणारे शहर म्हणून नवी मुंबईचा राज्यात नावलौेकिक आहे.

या वर्षी नवी मुंबईत १० जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मात्र शहरात व धरण पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे. आतापर्यंत फक्त १८८ मिमी पावसाची नोंद धरण पाणलोट क्षेत्रात झाली आहे. मागील वर्षी आतापर्यंत ८९९.२० मिमी तर सरासरी ३८०० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत होते. यावर्षी आतापर्यंत तुरळक पाऊस झाल्याने पुढील काळात धरण भरण्यासाठी सरासरी ४५०० मिमी पावसाची आवश्यकता आहे. आतापर्यंत धरण ५० टक्केपर्यंतही भरलेले नसल्याने पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून चिंता व्यक्त होत आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास शहरावर पाणीकपात करण्याची वेळ येणार आहे. २०१८ या वर्षी धरण २५ जुलै रोजी तर २०१९ या वर्षी ४ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते.

शहराला पाणी पुरवठय़ासाठी या धरणातून प्रतिदिन ४२० दशलक्ष लिटर पाणी दररोज घेतले जात आहे. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. हे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा धरणात १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. सद्यास्थीतीत २७.८२ टक्के पाणीसाठा असून ७०.०२ मीटर पाण्याची पातळी असून ५३.११० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा उपलब्ध पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत पुरेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणसाठा व पाऊस

वर्ष २०२२-२३               वर्ष २०२१-२२

सरासरी                       १८८ मिमी                   ८९९.२० मिमी

धरणाची पातळी          ७०.०२ मीटर                ७४.९० मीटर

एकूण संचयन            ५३.११० दलघमी          ८१.४६९ दलघमी

पाणीसाठा                    २७.८२ टक्के                 ४२.६७ टक्के

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai around 27 percent water available in morbe dam zws

Next Story
प्रकल्पग्रस्तांकडून स्वागतसंघर्ष फळास आल्याच्या भावना
फोटो गॅलरी