नवी मुंबई : विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पांडुरंग निंबा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशीचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले. आत्महत्येपूर्वी पाटील यांनी केलेले व्हिडीओ, त्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोप आणि कारच्या डिकीत सापडलेली आठ पानी चिठ्ठी यांची तपासणी करून तथ्यांच्या आधारे कारवाई केली जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
पाटील यांच्या व्हिडीओमध्ये एका माजी पोलीस उपायुक्त, एका सहाय्यक पोलीस आयुक्त आणि एका हेड क्लार्ककडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांबाबत त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती.
पाटील यांच्या पाकिटात कारच्या डिकीत चिठ्ठी ठेवल्याचा उल्लेख असलेला कागद मिळाल्यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली. त्यातून आठ पानी पत्र ताब्यात घेण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या पत्रातील मजकुराची तसेच त्यात करण्यात आलेल्या आरोपांची पडताळणी केली जात आहे. व्हिडीओ आणि पत्रातील माहिती एकमेकांशी जुळते का, तसेच पाटील यांच्या आत्महत्येमागे नेमकी कोणती परिस्थिती होती, याचाही तपास केला जाणार आहे.
पाटील यांच्या मुलीने वडिलांना वारंवार बदलीची धमकी दिली जात होती आणि पैसे गोळा करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून तपासातून त्याची सत्यता स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. त्यानंतर ठाणे-बेलापूर मार्गावर काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यामुळे आता पाटील यांनी केलेले आरोप आणि त्यांच्या मृत्यूमागील परिस्थिती तपासातून कितपत स्पष्ट होते, याकडे लक्ष लागले आहे.
“व्हिडीओ आणि जप्त करण्यात आलेल्या आठ पानी चिठ्ठीसह उपलब्ध सर्व पुराव्यांची कसून पडताळणी करण्यात येत आहे. तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.” – मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई</strong>
