नवी मुंबई : नवी मुंबईत रिक्षा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘मीटर बंद’ ही डोकेदुखी ठरत आहे. रेल्वे स्थानके, प्रमुख चौक, मॉल, रुग्णालये आणि आयटी पार्क परिसरात मीटर न लावता थेट भाडे सांगणाऱ्या रिक्षा चालकांचा सुळसुळाट वाढला आहे. यामुळे रोजच्या प्रवासात प्रवाशांची आर्थिक लूट होत असून, वाहतूक विभागाची कारवाई केवळ कागदावरच असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे.

सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी, तसेच रात्री उशिराच्या वेळी किंवा अवजड सामान असल्यास, तसेच पावसाळ्यात अनेक रिक्षा चालक मीटर लावण्यास सरळ नकार देतात. “मीटरने येणार नाही”, “इतकेच भाडे लागेल”, “इकडे जाणार असाल तर अमुकच रक्कम द्यावी लागेल”, “मीटर बंद आहे, ठरावीक पैसे होतील” अशा अटी घालून प्रवाशांना गंडा घातला जातो. काही वेळा मीटर सुरू असतानाही ठरावीक अंतरानंतर चालक मीटर बंद करून अतिरिक्त रक्कम मागत असल्याच्या तक्रारीही प्रवासी करत आहेत.

सानपाडा, जुईनगर, कोपरखैरणे, नेरूळ परिसरात अशा रिक्षा चालकांचे प्रमाण अधिक आहे. रेल्वे स्थानक परिसरात उतरलेल्या प्रवाशांची अडचण अधिकच वाढते. बरेचदा रिक्षांची उपलब्धता कमी असल्याचा फायदा घेत अनेक चालक ठरावीक दरापेक्षा दुप्पट-तिप्पट भाडे सांगतात. पर्याय नसल्याने प्रवासी नाईलाजाने तेवढी रक्कम देतात. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांनाच याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

वाहतूक नियमांनुसार मीटरनुसार भाडे घेणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. कधीतरी होणाऱ्या धडक कारवायांनंतर परिस्थिती काही दिवस सुधारते, मात्र पुन्हा ‘मीटर बंद’ संस्कृती जोर धरते, असा नागरिकांचा अनुभव आहे. नवी मुंबईसारख्या नियोजित शहरात सार्वजनिक वाहतुकीचा हा बेजबाबदार चेहरा प्रवाशांचा विश्वास डळमळीत करणारा ठरत आहे. प्रभावी तपासणी, सातत्यपूर्ण कारवाई आणि तक्रार यंत्रणा अधिक सक्रिय करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

दरम्यान, यासंदर्भात नवी मुंबईचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी अशा रिक्षांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

उद्धट वर्तन मीटर बंदला विरोध केल्यास काही चालक उद्धट वर्तन करत असल्याचेही प्रकार समोर येत आहेत. “इतर रिक्षा मिळणार नाही”, “यायचे असेल तर या, नाहीतर उतरा” अशा धमकावणाऱ्या भाषेचा वापर होत असल्याने अनेक प्रवासी तक्रार करण्याऐवजी गप्प राहणे पसंत करतात. परिणामी अशा चालकांना आणखीच मोकळे रान मिळत आहे.