नवी मुंबई : भिवंडीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळून दहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर धोकादायक इमारतींबाबत प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने शहरातील सी-१ प्रवर्गातील ३४ अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. या इमारतींमध्ये वास्तव्यास असलेले मालक, भोगवटादार आणि व्यावसायिकांनी त्वरित स्थलांतर करून निवासी व व्यावसायिक वापर बंद करावा, अन्यथा कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवरच राहील, असा स्पष्ट इशारा महापालिकेने दिला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सन २०२६-२७ मधील अतिधोकादायक (सी-१) इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या ५ नोव्हेंबर २०१५ च्या शासन परिपत्रकानुसार या इमारती निवासी व व्यावसायिक वापरासाठी धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. संबंधित मालक व भोगवटादारांना यापूर्वीच लेखी नोटिसा देण्यात आल्या असून, इमारती रिकाम्या करून त्या पाडण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या मते, या इमारतींचा वापर सुरू राहिल्यास कोणत्याही क्षणी इमारत कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, तसेच धोकादायक बांधकाम विनाविलंब पाडण्याची कार्यवाही करावी. सी-१ प्रवर्गातील इमारतींची वीज व पाणी जोडणी खंडित करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने पुन्हा दिला आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, वारंवार सूचना व नोटिसा देऊनही इमारतींचा वापर सुरू ठेवल्यास आणि त्यातून एखादी दुर्घटना घडल्यास त्यासाठी संबंधित मालक, भोगवटादार किंवा वापरकर्ते स्वतः जबाबदार राहतील. अशा परिस्थितीत महापालिका जबाबदार राहणार नसल्याचेही जाहीर आवाहनात नमूद करण्यात आले आहे.
यंदाच्या यादीत बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली आणि दिवा विभागांतील एकूण ३४ इमारतींचा समावेश आहे. त्यामध्ये गणेश को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, पंचशील अपार्टमेंट, सायलेंट व्हॅली, पुनित पार्क, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, हॅपी होम, प्रगती, वसंत विहार, प्रितीसंगम, अमोली, पार्क व्ह्यू, श्री विनायक, सातकृपा, गगनगिरी, चंद्रलोक, सिल्व्हर नेस्ट, सिटी गार्डन, राज पॅलेस, सहजीवन अपार्टमेंट आदी निवासी इमारतींसह तुर्भे येथील कांदा-बटाटा बाजार आणि मसाला बाजारातील काही इमारतींचाही समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात राज्यातील विविध भागांत धोकादायक इमारती कोसळून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शुक्रवारी भिवंडीत घडलेल्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना धोकादायक इमारतींबाबत कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेनेही नागरिकांना सावध करत अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आवाहन केले आहे.
भिवंडी दुर्घटनेनंतर वाढली सतर्कता
भिवंडीत पाच मजली इमारतीचा भाग कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर राज्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अतिधोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने सी-१ प्रवर्गातील ३४ इमारतींबाबत नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
