कॅबमधून प्रवास करणाऱ्या महिलेने तिचा विनयभंग करण्यात आला, असा आरोप ती प्रवास करीत असलेल्या कॅबच्या चालकावर केला आहे. याबाबतचा तपास नवी मुंबई विमानतळ पोलिस घेत असून, संबंधित चालकाचा शोध सुरू आहे. रविवार, ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने नवी मुंबई विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महिला चेंबूर परिसरातील एका पार्टीला गेली होती. पार्टी संपल्यानंतर ती कॅबने घरी परतत होती. मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास चालकाने निर्जन ठिकाणी गाडी थांबवली.

पाणी पिण्याच्या बहाण्याने थांबवली गाडी

महिलेच्या तक्रारीनुसार, चालकाने पाणी पिण्याच्या बहाण्याने कॅब रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर तो काही वेळासाठी गाडीतून बाहेर गेला. मात्र, परतल्यानंतर तो थेट मागच्या सीटवर महिलेच्या शेजारी येऊन बसला आणि तिचा हात पकडला. महिलेने चालकाला पुन्हा पुढे जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर चालकाने जबरदस्तीने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेच्या विरोधानंतर चालक घटनास्थळावरून फरार

चालकाच्या या कृत्यामुळे घाबरलेल्या महिलेने विरोध केला. त्यानंतर चालक तेथून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर महिलेने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यानंतर पनवेल पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

आरोपीची मोहम्मद अफजल शेख, अशी ओळख पटवली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

“प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. तांत्रिक माहिती आणि मानवी गुप्तवार्तेच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपीविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलिसांनी दिली.