नवी मुंबईतील रबाळे वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराच्या विरोधात याच ठिकाणी महिला पोलीस शिपाई म्हणून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे. तर संबधित हवालदारानेही मारहाण आणि मोबाईल चोरी प्रकरणी त्या महिला शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोपीचे नाव रामदास सोनावणे असून ते रबाळे वाहतूक पोलीस विभागात हवालदार म्हणून काम करतात तर फिर्यादी महिला या शिपाई पदावर काम करतात. सोनावणे यांनी फिर्यादी यांच्या परिचित रिक्षा चालकाला मारहाण केली होती. ती सोडवण्यास गेलेल्या या महिला शिपायालाही अर्वाच्च शिवीगाळ करत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यामुळे सोनावणे यांच्या विरोधात सदर महिला शिपाई कर्मचाऱ्याने विनयभंगचा गुन्हा दाखल केला. तर सोनावणे यांनीही मारहाण आणि मोबाईल चोरी प्रकरणी त्या महिला शिपाई विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी एकालाही अद्याप अटक केलेले नाही. आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी डी ढाकणे यांनी दिली. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसापासून वाद असून अनेक वाहतूक पोलिसांना माहिती आहेत. त्याचाच हा परिणाम असल्याची चर्चा वाहतूक विभागात होत आहे