नवी मुंबई – सिडकोच्या पाणीपुरवठा क्षेत्रात धरणांतील घटता जलसाठा आणि पावसाळा उशिरा सुरू होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर २८ मेपासून आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. सिडकोने दहा टक्के पाणी कपातीसह विविध नोडमध्ये वेगवेगळ्या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे वेळापत्रक जाहीर केले असून नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.
सिडको क्षेत्रातील हेटवणे, मोरबे, बारवी आणि पाताळगंगा धरणांमधून नवी मुंबई, पनवेल परिसरातील नोड तसेच गावांना पाणीपुरवठा केला जातो. वाढत्या उन्हामुळे धरणांतील उपयुक्त जलसाठा कमी होत असून तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच हवामान खात्याने एल-निनो आणि आयओडी परिणामांमुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तविल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी सिडकोने ही उपाययोजना हाती घेतली आहे.
सिडकोने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार खारघर आणि नवीन पनवेल (पूर्व) येथे सोमवारी, नवीन पनवेल (पश्चिम) आणि उलवेच्या काही सेक्टरमध्ये मंगळवारी, कळंबोली-नावडे येथे बुधवारी, करंजाडे येथे गुरुवारी, तर तळोजा, कामोठे, काळुंद्रे आणि उलवेच्या काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. द्रोणागिरी परिसरात रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याचेही सिडकोने स्पष्ट केले आहे.
वाहन धुणे, पिण्यायोग्य पाण्याचा अनावश्यक वापर, गळतीकडे दुर्लक्ष आणि टाक्या ओव्हरफ्लो होणे टाळावे, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
