नवी मुंबई – उलवे नोडमधील अनधिकृत आठवडा बाजारासह कोपरखैरणे नोडमधील अनधिकृत बांधकामाविरोधात सिडको आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. उलवेतील पाच सेक्टरमधील रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली, तर कोपरखैरणे येथील सुमारे ९० चौ. मीटर क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामाचे सहा स्लॅब पाडण्यात आले. सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.उलवे नोडमधील सेक्टर २, ५, १९, २० आणि २१ परिसरात सोमवारपासून (ता.२४) अनधिकृत आठवडा बाजाराविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईत रस्ते आणि पदपथांवर व्यवसाय करणारे अनधिकृत विक्रेते, हातगाड्या तसेच वाहतुकीला आणि नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा ठरणारे साहित्य हटविण्यात आले. सिडकोचे अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा रक्षक, उलवे पोलीस, कामगार आणि टेम्पो या कारवाईत सहभागी झाले होते.मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशाने, सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे मुख्य नियंत्रक विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रक अमित राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.तसेच मंगळवारी (ता.२५) कोपरखैरणे नोडमधील सेक्टर १२ डी तसेच मौजे बोनकोडे येथील सर्व्हे क्रमांक २० मध्ये श्रीकांत मनोहर मढवी आणि विकासक आदेश पाटील यांच्या सुमारे ९० चौ. मीटर क्षेत्रावरील आरसीसी तळमजल्याच्या अनधिकृत बांधकामावर पाडकामाची कारवाई करण्यात आली.
ब्रेकर आणि गॅस कटरच्या साहाय्याने बांधकामाचे सहा स्लॅब पाडण्यात आले.या कारवाईसाठी आठ ब्रेकर, दहा कामगार, एक पर्यवेक्षक आणि एक छायाचित्रकार तैनात करण्यात आल्याचे सिडकोने सांगीतले. तसेच सिडको सुरक्षा रक्षक, एमएसएफ कर्मचारी, सिडको पोलीस पथक आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील कर्मचारीही उपस्थित होते. सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये आणि प्रशासनाच्या कारवाईस सहकार्य करावे, असे आवाहन सिडको आणि पोलिसांनी केले आहे.
