नवी मुंबई : स्वस्त आणि किफायतशीर घरांची उपलब्धता वाढावी यासाठी नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरात महागृहनिर्माणाचे प्रकल्प एकीकडे हाती घेतले जात असताना खारघर आणि सीवूडसारख्या उपनगरात सिडकोने उभारलेल्या आणि गेल्या दहा वर्षांपासून विक्रिविना पडून असलेल्या ७०६ घरांसाठी नव्याने ग्राहकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. खारघरमधील वास्तुविहार, व्हॅलिशिल्प तसेच पाम बिच मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एनआरआय कॉम्प्लेक्समधील ही घरे विकली जावीत यासाठी सिडकोने या घरांचे दर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिडकोने नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर अल्प आणि मध्यम वर्गासाठी घरांची उभारणी केली आहे. मागील काही वर्षात सिडकोने पुन्हा एकदा गृहनिर्माणावर भर दिला असून नुकतीच २६ हजार घरांच्या विक्रीची महागृहनिर्माण योजनाही जाहीर करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी वाशी, खारघर, मानसरोवर रेल्वे स्थानक परिसर, खांदेश्वर आणि तळोजा परिसरात जाहीर करण्यात आलेल्या या योजनेस मोठा प्रतिसादही मिळतो आहे. सिडको या काळात ६७ हजार घरांची बांधणी करत असून यापैकी गृहविक्रीचा पहिला टप्पा नुकताच सुरू करण्यात आला आहे. असे असले तरी सिडकोने खारघर आणि सीवूड या उपनगरात यापूर्वी उभारलेली सातशेपेक्षा अधिक घरे ‘महाग’ ठरल्याने या घरांच्या विक्रीसाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
हे ही वाचा… पनवेलकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा; प्रदूषणामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ
सवलत मूल्यही महाग ?
सिडकोने नव्या प्रकल्पांची उभारणी करत असताना वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये विक्रीविना पडून असलेल्या ७०१ घरांच्या विक्रीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असून सविस्तर अभ्यास करून नवे दरपत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिसिल संस्थेमार्फत सिडकोने केलेल्या सर्वेक्षणानुसार या घरांच्या लगत असलेल्या वसाहतींमधील इतर घरांच्या बाजारमूल्याची तुलना करून सिडकोने नवे दरमूल्य ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी मोठ्या आकाराच्या घरांचे मूल्य बाजारमूल्यापेक्षा अधिकच आखण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान सिडकोने धोरणानुसार घरांचे जे दर निश्चित केले आहेत त्यापेक्षा पडून राहिलेल्या घरांच्या विक्रीसाठी ८० टक्के रकमेचा नवा फॉर्म्युला आखण्यात आला आहे, अशी माहिती सिडकोमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे सवलत दर सिडकोमार्फत नुकत्याच जाहीर प्रकल्पांना लागू नसतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
ही घरे महाग कशी?
सिडकोने २००७ ते २०१३ या काळात खारघरमध्ये वास्तुविहार, व्हॅलिशिल्प आणि सीवूड येथील एनआरआय कॉम्प्लेक्स परिसरात उच्चभ्रूंसाठी घरे उभारली. याशिवाय खारघर भागातील स्वप्नपूर्ती वसाहतीत अल्प उत्पन्न गटासाठी उभारलेली घरेही तुलनेने महाग ठरल्याने फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सिडकोने २०१७ मध्ये घरांच्या विक्रीमूल्याचा फेरआढावा घेतला. या आढाव्यानंतरही सध्या खारघर तसेच आसपासच्या परिसरातील खासगी विकासक ज्या दराने घरांची विक्री करत आहेत त्यातुलनेत सिडकोची जुनी घरे महाग ठरल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
हे ही वाचा… औद्योगिक पट्टयातील हिरवाई धोक्यात? वनराई असलेल्या भूखंडविक्रीस पर्यावरणप्रेमींचा विरोध
कोणत्या प्रकल्पात घरे पडून?
सिडकोने खारघर सेक्टर ३६ येथे उभारलेल्या स्वप्नपूर्ती प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी उभारलेल्या वसाहतीमधील ४०१, वास्तुविहार प्रकल्पातील ३४, व्हॅलिशिल्प प्रकल्पातील २५४ आणि सीवूड एनआरआय प्रकल्पातील १७ घरांची अजूनही विक्री झालेली नाही. मध्यंतरी या घरांच्या विक्रीसाठी सिडकोने एक सवलत योजना आखली होती. त्यानुसार एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये पाच घरांच्या खरेदीसाठी प्रस्तावही पुढे आले. मात्र या भागातील बाजारमूल्याची तुलना केली असता ही घरे महाग ठरल्याने या खरेदीदारांनी प्रस्ताव मागे घेतले.
ठिकाण | सदनिका प्रकार | बांधकाम क्षेत्र (चौ.फू.) | न विकल्या गेल्या सदनिका | रिक्त असल्याचा कालावधी (महिने) |
स्वप्नपूर्ती सेक्टर ३६, खारघर | EWS | ५०५.८७ | ४२ | १० |
LIG | ६३३.०७ | ३५९ | १० | |
वास्तुविहार आणि सेलिब्रेशन | KH – III | ६०९.४५ | १० | १७ |
योजना सेक्टर १६/१७ खारघर | KH – IV | १०३१.०८ | २४ | १७ |
व्हॅलीशिल्प सेक्टर ३६, खारघर | MIG | ९७१.२१ | ११८ | ११ |
HIG | १५२०.६३ | १३६ | ११ | |
सीवूड्स इस्टेट | 2BHK | १२३०.६१ | १३ | १७ |
(एनआरआय कॉम्प्लेक्स) | 3BHK | १६५१.०५ | ४ | १७ |