scorecardresearch

१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान नवी मुंबई शहर सज्ज ; १६ देशांचा सहभाग , ३० ऑक्टोंबरला अंतिम सामनाही डी.वाय पाटील मैदानावरच

या स्पर्धेत १६ देशांचा सहभाग असून ३० ऑक्टोंबरला अंतिम सामनाही डी.वाय पाटील मैदानावरच रंगणार आहे.

१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान नवी मुंबई शहर सज्ज ; १६ देशांचा सहभाग , ३० ऑक्टोंबरला अंतिम सामनाही डी.वाय पाटील मैदानावरच

नवी मुंबई– जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाच्या १७ वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा  भारतात होत असून नवी मुंबई शहराला यजमान शहराचा बहुमान लाभलेला आहे.हे सामने पाहण्याकरिता जगभरातून येणा-या फुटबॉल खेळाडूंच्या व क्रीडारसिकांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज होत आहे.स्पर्धेच्यादृष्टीने कोणतीही कमतरता राहणार नाही असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत  बांगर यांनी दिले आहेत. या स्पर्धेत १६ देशांचा सहभाग असून ३० ऑक्टोंबरला अंतिम सामनाही डी.वाय पाटील मैदानावरच रंगणार आहे.

 ११ ते ३० ऑक्टोबर भारतामध्ये होत असलेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील  महत्वाचे १० सामने डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत.पाटील स्टेडियममध्ये १२, १५, १८, २१ व ३० ऑक्टोबरला सामने होणार आहेत.त्यामुळे यजमान शहर म्हणून पालिकेने जय्यत तयारी सुरु केली आहे.याबाबत नुकतीच आयुक्तांनी बैठक घेऊन चोख कार्यवाहीचे निर्देश सर्वच विभागांना दिले आहेत.

प्रत्येक दिवशी २ सामने याप्रमाणे ५ दिवस डॉ. डि.वाय.पाटील स्टेडियम येथे सामने होणार असून विशेष म्हणजे या स्पर्धेचा अंतिम सामना ३० ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममध्ये होणार आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये अमेरिका, मोरोक्को, ब्राझिल, जर्मनी, नायजेरिया, चिली, न्युझिलंड, स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, चीन, जपान, टान्झानिया, कॅनडा, फ्रान्स आणि यजमान भारत अशा १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने २०१७ मध्ये नवी मुंबईत झालेल्या फिफा स्पर्धेच्या वेळी विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेक्टर १९ नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामध्ये या स्पर्धेतील सामन्यांपूर्वीचा सराव हे फुटबॉल संघ करणार असून त्याठिकाणची सर्व व्यवस्था सुसज्ज राहील व विशेषत्वाने फ्लड लाईटच्याबाबतची कामे गुणवत्तापूर्ण व जलद करण्याचे आदेश दिले आहेत.नवी मुंबई शहरामध्ये जागतिक स्पर्धेच्या निमित्ताने “फुटबॉल फिव्हर” निर्माण व्हावा यादृष्टीने “स्वच्छ सर्वेक्षण २०२३” ला याच कालावधीत सुरुवात होत असल्याने शहरातील महत्वाच्या चौकांचे व प्रदर्शनी जागांचे फुटबॉल खेळाच्या अनुषंगाने सुशोभिकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छ शहर हा नवी मुंबईचा केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही लौकीक असून त्यादृष्टीने शहरातील स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष दिले जात आहे. वैद्यकीय व अग्निशमन पथकांनी फुटबॉल असोसिएशनच्या पदाधिका-यांच्या संपर्कात राहून योग्य ठिकाणी आपली पथके व रुग्णवाहिकेसह इतर वाहने तैनात ठेवावीत असे सूचित करुन सामन्यांच्या दिवशी विशेष दक्षता घेण्याचेही आदेश दिले आहेत.

नवी मुंबईत होणाऱ्या स्पर्धेसाठी  यजमान शहर  सज्ज असून चोख व्यवस्था करण्यात येत आहे.या जागतिक स्पर्धेमुळे शहराचा  नावलौकिक उंचावणार आहे.अभिजीत बांगर ,आयुक्त नवी मुंबई महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या