नवी मुंबई : शहराच्या पायाभूत सुविधांची क्षमता तपासल्याशिवाय क्लस्टर पुनर्विकासाचे प्रस्ताव पुढे नेण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेला नवी मुंबई महापालिकेने आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शहराची वहन क्षमता आणि पायाभूत सुविधांवरील संभाव्य परिणामांचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत युआरएस (शहरी पुनर्नवीकरण योजना) अर्थात क्लस्टर पुनर्विकासाच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये, अशी भूमिका घेत शासनाच्या १५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निर्देशांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. यासंबंधीचा ठराव सोमवारी (२ नोव्हेंबर) झालेल्या महासभेत ६० विरुद्ध ३१ मतांनी मंजूर झाला. दरम्यान, घणसोलीतील सिम्प्लेक्स क्लस्टर योजनेवरून शिवसेनेच्या शिंदे गटातील अंतर्गत मतभेदही याच चर्चेत उघड झाले.
महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत युआरएस आणि शासनाच्या पत्रावर चर्चा झाली. यापूर्वी महासभेने क्लस्टर पुनर्विकासाच्या प्रस्तावांना स्थगिती देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, नगरविकास विभागाने १५ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे यापूर्वी अधिसूचित झालेले आणि उच्चाधिकार समितीसमोर प्रलंबित असलेले प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी मार्गी लावण्याचे निर्देश दिले. शहराच्या पायाभूत सुविधांवरील परिणाम आणि वहन क्षमतेचा अभ्यास आवश्यक असल्याचे शासनाने मान्य केले असतानाच प्रलंबित प्रस्ताव पुढे नेण्याचे निर्देश दिल्याने महापालिकेने या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
सभागृह नेते सागर नाईक यांनी शासनाला पाठविण्यात येणाऱ्या आक्षेपांच्या प्रारूपाचे सभागृहात वाचन केले. केवळ अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळतो किंवा पुनर्विकासातून आर्थिक फायदा होतो म्हणून शहरात विशेष पुनर्विकास योजना राबवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईची उभारणी करताना लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांची क्षमता विचारात घेऊन नियोजन करण्यात आले होते. मात्र, शहराच्या क्षमतेचा विचार न करता अतिरिक्त बांधकामांना परवानगी दिल्यास भविष्यात नियोजन कोलमडू शकते, असा इशारा त्यांनी दिला. बंगळुरूमधील वाहतूक कोंडीचे उदाहरण देत नवी मुंबईतही अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. घणसोलीसारख्या भागांत सध्या पाणीपुरवठ्याच्या मर्यादा जाणवत असताना लोकसंख्येचा अतिरिक्त भार टाकणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
महापालिकेचा पुनर्विकासाला विरोध नसून नियमित विकास नियंत्रण नियमांनुसारही पुनर्विकासाचे पर्याय उपलब्ध आहेत, असे नाईक यांनी स्पष्ट केले. भूखंडांचे एकत्रीकरण करून नियमित नियमांनुसार पुनर्विकास शक्य असताना विशेष युआरएस योजनेचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या भागांमध्ये दाटीवाटी आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे, अशा क्षेत्रांना क्लस्टर पुनर्विकासात प्राधान्य मिळायला हवे. अन्यथा पाणीपुरवठा, मलनिःसारण आणि वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सी-१ प्रवर्गातील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास मात्र थांबवू नये, अशी भूमिका महापालिकेने स्पष्ट केली. अशा इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थलांतर आणि नियमित नियमांनुसार पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू राहावी. मात्र, धोकादायक इमारतींचा प्रश्न पुढे करून सर्व क्लस्टर प्रस्तावांना अभ्यासाशिवाय मंजुरी देणे योग्य ठरणार नाही, असे नाईक यांनी सांगितले.
नगरसेवक सुरज पाटील यांनी शासनाच्या निर्देशांविरोधात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्याची उपसूचना मांडली. शहरव्यापी परिणाम अभ्यास आणि वहन क्षमतेचे परीक्षण पूर्ण होईपर्यंत क्लस्टर १ व २ सह अन्य प्रलंबित प्रस्तावांच्या पुढील मंजुरीला अंतरिम स्थगिती मागावी, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी आयुक्तांनी विधी सल्ला घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि अधिवक्त्यांची नियुक्ती करून याचिका दाखल करावी, असेही त्यांनी सुचवले.
उपमहापौर दशरथजी भगत यांनी शासनाच्या पत्रातील निर्देश आणि उच्चाधिकार समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत न्यायालयात जाण्याच्या भूमिकेला समर्थन दिले. मोठ्या विकास प्रकल्पांचा खाडी परिसर आणि मत्स्यसंपदेवर होणारा परिणाम तपासण्यासाठी स्वतंत्र अभ्यास करण्याची सूचनाही त्यांनी मांडली. शिवसेना (शिंदे) नगरसेवक शिवराम पाटील यांनी या विषयावर सभागृहाचे स्पष्ट मत नोंदवण्यासाठी मतदानाची मागणी केली.
अखेर मतदानात ६० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने, तर ३१ सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्यानुसार शासनाला महापालिकेचे आक्षेप नोंदवणारे प्रत्युत्तर पाठविण्यासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले. शहराच्या वहन क्षमतेचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत युआरएस प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या शासनाच्या निर्देशांना विरोध कायम ठेवण्यात आला असून, यापूर्वी मंजूर केलेल्या ठराव क्रमांक १००२ ची अंमलबजावणीही कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे क्लस्टर पुनर्विकासाच्या मंजुरीवरून शासन आणि महापालिका यांच्यातील संघर्ष आता न्यायालयात पोहोचणार असून, प्रलंबित प्रकल्पांच्या भवितव्याबाबत न्यायालयीन निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
घणसोलीच्या क्लस्टरवरून शिंदे गटातच मतभेद; प्रशांत पाटील यांचा घरचा आहेर
घणसोलीतील बहुचर्चित सिम्प्लेक्स क्लस्टर योजनेवरून शिवसेनेच्या शिंदे गटातील अंतर्गत मतभेद महासभेत समोर आले. स्थानिक नगरसेवक प्रशांत पाटील यांनी या योजनेला विरोध करत दलाल आणि एजंटांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप केला. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रलोभने दाखवली जात असून त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात असल्याचे ते म्हणाले. घणसोलीत पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि पायाभूत सुविधांवर आधीच ताण असताना अतिरिक्त बांधकामांचा भार टाकणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी संबंधित क्षेत्रातील युआरएस योजना तातडीने रद्द करण्याची मागणी केली. योजनेला नागरिकांचा विरोध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पाच हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. मात्र, त्यांच्या आरोपांना शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे क्लस्टर योजनेच्या मुद्द्यावरून शिंदे गटातील दोन नगरसेवकांच्या भूमिकांमध्ये मतभेद असल्याचे महासभेत स्पष्ट झाले.
