नवी मुंबई : नवी मुंबईत ‘क्लस्टर‘च्या अंमलबजावणीवरून सुरू झालेल्या राजकीय वादामुळे महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांच्या प्रशासकीय अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. शहरातील पायाभूत सुविधांची क्षमता तपासल्याशिवाय क्लस्टर पुनर्विकासाचा प्रस्ताव पुढे नेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेला महापालिकेने न्यायालयात आव्हान द्यावे अशा स्वरूपाचा ठराव सत्ताधारी भाजपने सोमवारी महासभेत मंजूर केला. यासाठी लागणारा सगळा खर्च महापालिकेनेच करावा असेही या बैठकीत ठरले. सत्ताधाऱ्यांच्या या ठरावामुळे नगरविकास विभागाविरोधात थेट न्यायालयात धाव घेण्याची तयारी प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्तांना करावी लागणार आहे. त्यामुळे या ठरावाची कायदेशीर तपासणी प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेच्या ठरावाविषयी प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी २४ तास उलटल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. या विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना शिंदे तेथे नव्हते. यावेळी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनील पवार हे सभागृहात उपस्थित होते. त्यांनीही यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली नाही. राज्य सरकारने ‘क्लस्टर’ अंमलबजावणीसंबंधी दिलेल्या आदेशांवर आक्षेप घेत महापालिकेने थेट न्यायालयात धाव घ्यावी आणि त्यासाठी ज्येष्ठ विधितज्ज्ञांची नेमणूक केली जावी अशा स्वरूपाचा ठराव सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. यासाठी लागणारा संपूर्ण खर्च महापालिकेने स्वत:च्या तिजोरीतून करावा असेही यावेळी ठरले. हा ठराव मंजूर करत असताना त्यावर प्रशासनाने आपली भूमिका ठामपणे मांडण्याची आवश्यकता होती. मात्र सभागृहात तसे दिसले नाही. या निर्णयावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याविषयी आयुक्त शिंदे यांनीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेविषयी महापालिका वर्तुळात कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.
भाजप-शिंदे वाद टोकाला
शहराच्या पायाभूत सुविधांची क्षमता तपासल्याशिवाय कोणत्याही क्लस्टर प्रकल्पाला मंजुरी देऊ नये अशा स्वरूपाचा ठराव सत्ताधारी भाजपने यापूर्वीच मंजूर केला होता. त्याविरोधात घणसोली तसेच वाशीतील काही रहिवासी संघटनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडे धाव घेतली. या विभागाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून उच्चाधिकार समितीने यापूर्वी मंजूर केलेल्या अथवा मंजुरीच्या प्रक्रियेत असलेल्या प्रकल्पांना मान्यता द्यावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यामुळे सत्ताधारी भाजपला हा मोठा धक्का मानला गेला. नगरविकास विभागाच्या आदेशामुळे घणसोली तसेच वाशी परिसरातील काही मोठे क्लस्टर प्रकल्प मार्गी लागणार आहेत. हे प्रकल्प एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांच्या प्रभाव क्षेत्रात येत असल्याने हा राजकीय वाद आणखी चिघळला आहे.
महानगरपालिकेच्या स्वतंत्र निगम अस्तित्वामुळे तिला स्वतःच्या वैधानिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात जाण्याची कायदेशीर क्षमता प्राप्त होते. तथापि, याचिकेचा विषय महानगरपालिकेच्या संस्थात्मक अधिकारांशी किंवा कायदेशीर हितसंबंधांशी संबंधित असणे आवश्यक आहे. केवळ प्रशासकीय मतभेद किंवा धोरणात्मक असहमती हा न्यायालयीन हस्तक्षेपाचा पुरेसा आधार ठरत नाही. तसेच, महानगरपालिकेच्या वतीने याचिका दाखल करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची आवश्यक मंजुरी व अधिकृत प्रतिनिधित्वाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. – दीप्ती खुळे, कायदेतज्ज्ञ
महापालिकेचा पुनर्विकासाला विरोध नसून नियमित विकास नियंत्रण नियमावलीनुसार पुनर्विकासाचे पर्याय उपलब्ध आहेत. ज्या भागात दाटीवाटी आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अशा क्षेत्रांना क्लस्टर पुनर्विकासात प्राधान्य मिळायला हवे. शहराच्या पायाभूत सुविधांवर एखाद्या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम होत असेल तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा स्थानिक प्राधिकरणाला अधिकार आहे. – सागर नाईक, सभागृह नेता
शहरातील धोकादायक ठरलेल्या इमारतींमध्ये राहाणाऱ्या आणि पुनर्विकासाचा पूर्ण अधिकार असलेल्या रहिवाशांना असे ठराव करून रोकणे पूर्णपणे बेकायदेशीर ठरते. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अशा नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास ठरावीक राजकीय नेते अडसर निर्माण करत आहेत. नागरिकांना हक्काच्या आणि स्वत:च्या नव्या घरांमध्ये राहायला जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या निर्णयाविरोधात जाण्यापूर्वी महापालिका आयुक्त सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घेतील ही अपेक्षा आहे. – किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख शिवसेना, शिंदे गट
