नवी मुंबई : शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर आता गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याची तात्काळ दखल घेत महापौर सुजाता पाटील यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या वेळी पाणी तपासणीचे निर्देश देण्यात आले.
जुईनगर, घणसोली, कोपरखैरणे, नेरुळ अशा विविध भागांतील नागरिकांनी नळातून येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची तक्रार केली आहे. काही ठिकाणी पाण्याला गढूळ रंग, तर काही भागांत दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा पुढे आला आहे.
उन्हाळ्यामुळे आधीच शहरातील पाणीस्थिती तणावपूर्ण बनली असताना आता दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. अनेक रहिवाशांना पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वेगळे पाणी विकत घ्यावे लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागांत नळातून येणाऱ्या पाण्यात सूक्ष्म कचरा किंवा कीटक आढळल्याच्याही तक्रारी पुढे आल्या आहेत.
जुईनगर सेक्टर २५ परिसरातील रहिवाशांनी तर महापालिकेच्या जलशुद्धीकरण यंत्रणेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वच्छ पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, उपकार नाहीत. शहरात पाणीकपात सुरू असताना जे पाणी मिळत आहे तेही दूषित असेल, तर नागरिकांनी नेमके करायचे काय, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या वाढत्या तक्रारींची दखल घेत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्यातर्फे सोमवारी महापौर दालनात पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठा, सुरू असलेली नियोजित पाणीकपात आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी या मुद्द्यांवर मुख्यत्वे चर्चा करण्यात आली.
हवामान खात्याने यंदा मान्सून उशिरा येण्याची आणि पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. त्याच वेळी पाणीकपातीच्या काळात नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
विशेष मोहीम
बैठकीत दिघा ते बेलापूरपर्यंतच्या सर्व नोड आणि प्रभागांमध्ये तातडीने पाण्याचे नमुने घेऊन चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले. जलवाहिन्यांमध्ये गळती, तांत्रिक बिघाड किंवा दूषित पाणी मिसळण्याच्या शक्यता तपासण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वीच अशा तक्रारी वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दूषित पाण्याचे मूळ कारण शोधून त्यावर तातडीने प्रक्रिया करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘वॉटर टेस्टिंग’ केले जाणार आहे.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी आपल्या परिसरात गढूळ किंवा दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यास महापालिकेच्या हेल्पलाइनवर किंवा अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाचा दावा
बैठकीत पिण्याच्या पाण्याचा बांधकाम प्रकल्पांसाठी अथवा इतर व्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या गैरवापराचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. शहरातील काही बांधकाम स्थळांवर पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पाण्याचे योग्य नियोजन आणि गैरवापराला आळा घातल्यास मान्सून उशिरा आला तरी शहरावर गंभीर पाणीटंचाईची वेळ येणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
