नवी मुंबई : महापालिकेच्या नगररचना विभागातील सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांच्या कारवाईवरून मंगळवारी महासभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार मतभेद झाले. अवनी आणि नैवेद्य गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासह विकास आराखड्यातील रस्ते आणि आरक्षित भूखंडांच्या मंजुरीतील कथित अनियमिततांप्रकरणी केकाण यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांना मूळ विभागात परत पाठविण्याचा आणि तोपर्यंत निलंबित ठेवण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. संपूर्ण मंजुरी प्रक्रियेची चौकशी न करता एकाच अधिकाऱ्याला जबाबदार धरणे योग्य नसल्याचा आक्षेप विरोधी सदस्यांनी घेतला.
माजी उपमहापौर भरत नखाते यांनी केकाण यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव मांडला. सभागृह नेते सागर नाईक यांनी या मागणीचे समर्थन केले. शिवसेना (शिंदे) नगरसेविका सोनवी लाड यांनी कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. चौकशीसाठी सादर केलेल्या माहितीमध्ये प्रकरण एका ना हरकत प्रमाणपत्रामुळे उद्भवल्याचे नमूद असताना तत्कालीन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्या २०२३ मधील पत्रात या प्रमाणपत्राचा उल्लेख लपविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सभागृहात चुकीची माहिती सादर करून दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार, असा सवाल त्यांनी केला. केकाण यांना यापूर्वी क्लीन चिट मिळाल्याची प्रत सदस्यांना देण्यात आली असताना पुन्हा त्यांच्यावरच कारवाईचा प्रस्ताव का, असा मुद्दाही त्यांनी मांडला. कारवाईला विरोध नसून चुकीची माहिती देणाऱ्या आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद ठरावात जोडावी, अशी उपसूचनाही त्यांनी मांडली.
शिवसेना (शिंदे) गटनेते मनोज हळदणकर यांनी अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव प्रकरणाचा संदर्भ देत इतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, अशी विचारणा केली. शिवसेना (शिंदे) नगरसेवक किशोर पाटकर यांनी विशिष्ट अधिकारी आणि गृहनिर्माण संस्थांची काही जण वैयक्तिक हितसंबंधांतून पाठराखण करत असल्याचा आरोप केला. दहा वर्षांपूर्वीच्या नियमांचा आधार घेऊन रस्त्याचा लाभ मिळविण्यासाठी ताकद वापरल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी केली. नगररचना विभागातील संबंधित मंजुरीच्या फाइलवर आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही स्वाक्षऱ्या असताना त्यांच्यावरही कारवाई करणार का, असा थेट सवाल त्यांनी सागर नाईक यांना केला. निर्णयप्रक्रियेतील सर्वांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली. महापालिका मुख्यालयासाठी सिडकोने दिलेला भूखंड सतरा प्लाझाला कसा विकण्यात आला, या प्रकरणाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. वारंवार अशा ठरावांवर चर्चा करून सभागृहाचा वेळ खर्च होत असून नागरिकांची कामे मागे पडत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
अखेर मतदानात ठरावाच्या बाजूने ३१, तर विरोधात २० मते पडली. दोन सदस्य तटस्थ राहिले. बहुमताने ठराव मंजूर झाल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी केकाण यांची प्रतिनियुक्ती तात्काळ संपुष्टात आणून त्यांना मूळ विभागात परत पाठविण्याची आणि प्रत्यक्ष कार्यमुक्ती होईपर्यंत निलंबित ठेवण्याचे निर्देश दिले. या निर्णयाची कारणांसह माहिती नगरविकास विभाग आणि त्यांच्या मूळ विभागाला तातडीने कळविण्यात यावी, तसेच नगररचना तदर्थ समितीचा अहवालही शासनाकडे पाठविण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
