नवी मुंबई : मुसळधारा आणि वादळी वाऱ्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. या घटनांनंतर महापालिकेने त्यामागील कारणांचा शास्त्रीय अभ्यास हाती घेतला. यामध्ये झाडे पडण्यास केवळ अतिवृष्टी कारणीभूत नसून, वाढते काँक्रीटीकरण, मुळांचे होणारे नुकसान, अशास्त्रीय छाटणी, अयोग्य वृक्षप्रजातींची निवड आणि शहरी विकासातील काही त्रुटी तेवढ्याच जबाबदार असल्याचे वृक्षतज्ज्ञांनी स्पष्ट केले. या निष्कर्षांच्या आधारे झाडांच्या देखभाल आणि व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या विशेष बैठकीत उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे यांच्यासह वृक्षतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर, डॉ. चंद्रकांत साळुंखे, शर्वरी बर्वे, सारंग फळे आणि वृक्ष विशेषज्ज्ञ (अर्बोरिस्ट) वैभव राजे यांनी सहभाग घेतला. बैठकीत जुलै महिन्यात कोसळलेल्या झाडांचा सविस्तर आढावा घेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

तज्ज्ञांच्या मते, शहरातील रस्ते आणि गृहनिर्माण संस्थांच्या परिसरातील सिमेंट काँक्रीटमुळे झाडांच्या मुळांना वाढण्यासाठी आवश्यक जागा मिळत नाही. त्यातच केबल, जलवाहिन्या आणि इतर भूमिगत सुविधांसाठी होणाऱ्या खोदकामामुळे मुळे कापली जातात. त्यामुळे झाडांची जमिनीवरील पकड कमकुवत होऊन वादळी पावसात ती उन्मळून पडतात. रस्त्यालगत आणि गृहनिर्माण संस्थांच्या परिसरातील ९० टक्क्यांहून अधिक झाडे याच कारणांमुळे पडतात, तर गावठाण आणि झोपडपट्टी भागात काँक्रीटीकरण कमी असल्याने तेथे झाडे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.

उंच इमारतींमुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने ती प्रकाशाच्या दिशेने झुकतात. ‘फोटो ट्रॉपिझम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेमुळे झाडांचे नैसर्गिक संतुलन बिघडते. तसेच अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी न करता एकाच बाजूने किंवा वरच्या भागाची छाटणी केली जाते. त्यामुळे वादळी वाऱ्याचा ताण वाढून झाडे पडण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे बैठकीत निदर्शनास आले.

पहिल्या पावसानंतर पानांवर पाणी साचल्याने झाडांचे वजन वाढते. त्याचवेळी मुळांभोवती पाणी साचून माती सैल होते. किनारपट्टीवरील शहर असल्याने नवी मुंबईत भूजल पातळी उंच असून त्यामुळे झाडांची पकड आणखी कमकुवत होण्याची शक्यता वाढते. वृक्षप्रजातींची निवडही महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. फायकस प्रजातीची झाडे रस्त्यालगत लावणे योग्य नसल्याचे, तर गुलमोहर आणि सोनमोहर या वृक्षांचे लाकूड ठिसूळ असल्याने त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले. याउलट नारळ आणि ताडाची झाडे वादळाचा तुलनेने चांगला सामना करतात.

जुलैतील अतिवृष्टीदरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील इतर शहरांप्रमाणे नवी मुंबईतही मोठ्या प्रमाणावर झाडे पडली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रथमच झाडांच्या पडझडीमागील कारणांचा शास्त्रीय अभ्यास सुरू केला आहे. मात्र, या बैठकीतील शिफारशी प्रत्यक्ष अंमलबजावणीत कितपत उतरतात आणि अनियंत्रित काँक्रिटीकरण तसेच अशास्त्रीय छाटणीवर कितपत नियंत्रण मिळते, यावरच पुढील पावसाळ्यात झाडांच्या पडझडीचे प्रमाण कमी होणार की नाही, हे अवलंबून राहणार आहे.

छाटणीचे नियोजन

राष्ट्रीय हरित लवाद आणि शहरी वनीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत महापालिका आता झाडांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कार्यपद्धती तयार करणार आहे.झाडांच्या मुळांबरोबरच शेंड्याचे व्यवस्थापन करून त्यांची उंची आणि आकार संतुलित ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच संतुलित छाटणी केली जाईल. झाडांच्या छाटणीसाठी स्वतंत्र ‘एसओपी’ तयार करून मार्च किंवा एप्रिल महिन्यात मान्सूनपूर्व छाटणी करण्याचे नियोजन आहे. ऑक्टोबर महिन्यात छाटणी टाळण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

झाडांच्या छाटणीपूर्वी आणि नंतरची छायाचित्रे घेणे बंधनकारक करण्यात येणार असून, सध्या झुकलेल्या झाडांचे स्वतंत्र दस्तऐवजीकरण केले जाईल. प्रत्येक झाडाचा स्वतंत्र अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल.अलीकडे पडलेल्या झाडांचे दृश्य मूल्यांकन केले जाणार असून, त्यांची यापूर्वी छाटणी झाली होती का, याचा वर्षभराचा तपशील तपासला जाईल. आवश्यकतेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने धोकादायक झाडांचे जोखीम मूल्यांकनही करण्यात येणार आहे.