नवी मुंबई : नेरुळ येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांचे सुटे भाग विकणारी दुकाने असून त्या दुकानांच्या समोरच्या पदपथावर अनधिकृत वाहन दुरुस्तीची दुकाने सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना कायमच करावा लागतो. अखेर तुर्भे पोलिसांनी अशा अनधिकृत गॅरेजवर तुर्भे वाहतूक पोलीस शाखा आणि मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई गुरुवारी करण्यात आली. यावेळी २२ पेक्षा अधिक गॅरेज व इतर दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूस गॅरेज व वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या दुकानांसमोर रस्त्यावर वाहने दुरुस्त करतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत फेरीवालेही विविध वस्तू विक्रीसाठी बसतात. तसेच वाहने अॅक्सेसरीजच्या दुकानात पदपथही वाहन दुरुस्तीकरिता वापरतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत वाहन दुरुस्ती दुकाने व वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या दुकानदारांना याबाबत वेळोवेळी नोटीस देण्यात आल्या आहेत. हेही वाचा - हजारो मच्छीमारांना नव्या हंगामात डिझेल कोट्याची प्रतीक्षा; अनुदानास मंजुरी नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड हेही वाचा - नवी मुंबई : १७६ मंडळांना मंडप परवानगी, महापालिकेकडून मिळालेली परवानगी पाच वर्षे ग्राह्य याबाबत नागरिकांच्या वेळोवेळी येणाऱ्या तक्रारींची गंभीर नोंद घेत नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी अशा बाबींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दयानंद महाडेश्वर व नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी स्वप्निल म्हात्रे, राजू शिंदे तसेच तुर्भे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार शिवाजी भोसले, वैभव पोळ, प्रदीप जाधव, विशाल आगुंडे यांच्या मदतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळी एकूण २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही अशाच प्रकारची कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिली.