नवी मुंबई : घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या मालिकेतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक करत नवी मुंबई गुन्हे शाखेने ११ गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी असा एकूण ११.६७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.

कोपरखैरणे येथील सेक्टर १२ बी मधील एका गृहनिर्माण संस्थेत ७ जून रोजी घरफोडीची घटना घडली होती. प्रमोद वादळ यांच्या घराचा दरवाजा उचकटून १५.५५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, तसेच शेजारी राहणारे संजय नागरे यांच्या घरातील ४० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या कक्ष-१ पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने दोन संशयितांची ओळख पटविण्यात आली. दोघेही सराईत गुन्हेगार असून कायम वास्तव्य बदलत मिरा-भाईंदर, चेंबूर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध लॉज व डॉरमेटरीमध्ये राहत असल्याची माहिती तपासात समोर आली.

सलग १६ दिवस आरोपींचा मागोवा घेतल्यानंतर गुन्हे शाखेने २३ जून रोजी कोपरखैरणे परिसरातून युसुफ रशिद शेख उर्फ दीपक उर्फ राहुल (वय ४२) आणि नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर (वय ३२) यांना अटक केली.

चौकशीत आरोपींनी कोपरखैरणे, पनवेल तालुका, बदलापूर, वाशिंद आणि नारपोली परिसरातील नऊ घरफोड्यांची, तसेच नौशादने अन्य साथीदारासह खारघर आणि बाजारपेठ परिसरातील दोन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. या तपासात कोपरखैरणे येथील घरफोडीतील ९.४७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, अन्य एका गुन्ह्यातील ८४ हजार ७०० रुपयांची सोन्याची साखळी तसेच दोन दुचाकी असा एकूण ११ लाख ६७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या कक्ष-१ पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा सातत्याने पाठलाग करून ही कारवाई यशस्वी केली. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.

१६ दिवसांचा मागोवा; आरोपींची शक्कल फसली

घरफोडीनंतर आरोपी कोणत्याही एका ठिकाणी न राहता दररोज वेगवेगळ्या लॉज आणि डॉरमेटरीमध्ये मुक्काम करत होते. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लावणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. मात्र सीसीटीव्ही विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सलग १६ दिवस आरोपींचा मागोवा घेत अखेर त्यांना कोपरखैरणे परिसरातून अटक केली.