नवी मुंबई: विवाह जुळवणाऱ्या विविध संकेत स्थळावरून ओळख करून घेत महिलांची आर्थिक शारीरिक पिळवणूक करणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या दोन संशयित आरोपीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या कडून ८९ लाख ४० रुपये जप्त करण्यात आले आहेत. यातील सूत्रधार हा सराईत असून त्याच्या विरोधात १५ पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

आदर्श प्रशांत म्हात्रे आणि प्रेम म्हात्रे असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यात गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग हा आदर्शचा होता तर आर्थिक फसवणूक करिता चुलत भाऊ प्रेम म्हात्रे याचे बँक खाते आदर्श वापरात होता. आदर्श हा शादी डॉट कॉम, जीवांसाठी डॉट कॉम, अनुरूप विवाह संस्था, भारत मेट्रोमोनी डॉट कॉम , मराठी शादी, अशा विवाह जुळवणाऱ्या संकेत स्थळावर स्वतःची बनावट वैयक्तिक माहिती भरून महिलांची फसवणूक करत होता. यासाठी त्याने आता पर्यंत स्वप्नील वारुळे, नहुष म्हात्रे , जयेश नाईक तन्मय म्हात्रे, जयेश पाटील, रुपेश गोवेकर, हेमंत गायकर, रुद्रेश गोधळी , जयेश सोनवणे, आदित्य म्हात्रे, हेमंत गोंधळी, जय पाटील या नावाने प्रोफाइल तयार करून महिलांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे.

रबाळे पोलीस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२५ मध्ये लग्नाचे अमिश दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने स्वपिन वारूळे असे खोटे नाव धारण करून शादी डॉट कॉम या मॅटोमोनियल या वेबसाईडवरून महीला फिर्यादीशी ओळख दिली होती. आरोपीने स्वतः इस्त्रो मध्ये शास्त्रज्ञ असल्याची थाप मारून फसवणूक केली होती. त्याच्यावर पीडितेने विश्वास ठेवला. तिला लग्न करण्याचे आश्वासन देवुन शारीरीक संबध प्रस्तापित केले. शिवाय तिच्या कडून गुजरात राज्यात जमिन खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगुन वैयक्तिक कर्ज घेण्यास भाग पाडले होते.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले.तपास सुरु करण्यात आला. अशा गुन्ह्यांचा अभिलेख तपासणी आणि घडलेल्या गुन्ह्याचा तांत्रिक अभ्यास केला असता आदर्श म्हात्रे याचे नाव समोर आले. त्याला २६ फेब्रुवारीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. त्याच्या विरोधात इस्त्रो सायंटिस्ट चे बनावट ओळखपत्र तयार करणे भारत सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीस असल्याची बनावट ओळखपत्र बनवणे बनावट आधारकार्ड बनवणे त्याद्वारे महीलांची आर्थिक फसवणुक लैगिंक अत्याचार करणे लग्नाचे आमिष दाखवणे त्यांना कर्ज घेण्यास भाग पाडणे, सायबर तंत्रज्ञान आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन गुंजाळ ( उपायुक्त – गुन्हे शाखा ) विवाह जुळवणाऱ्या संकेत स्थळावर स्वतः उच्च अधिकारी अति श्रीमंत असल्याचे प्रोफाइल आरोपी टाकत होता. त्याच बरोबर महागड्या गाड्या शेजारी उभा राहून आणि कुटुंबियांसमवेत फोटो टाकत होता. घटस्फोटित , एकट्या राहणाऱ्या महिलांची निवड करत होता. तसेच ज्या बँकेत पटकन वयक्तिक कर्ज मिळते असे बँक खाते त्या महिलांचे आहे कि नाही याची खात्री करून हेरत होता.

रबाळे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात सहा महिलांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांचे ९६ लाख ७० हजार पैकी ८९ लाख ४० रुपये जप्त करून संबंधित पीडित महिलांना दिले आहेत. २०१९ पासून तो असे गुन्हे करत असून २०२५ मध्ये १ गुन्हा २०२६ मध्ये – ४ गुन्हे तर २०२३ पूर्वी १० गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी चुलत भाऊ आहे. त्याच्या बँक खात्याचा वापर पीडित महिलांचे पैसे घेण्यास करत होता.त्याने अनेकांना कर्ज काढण्यास लावून ते पैसे स्वतः लाटले होते. त्यावर गोवा मुंबईत जाऊन जुगार मद्य डान्स बार वर जाऊन पैसे उधळून टाकत होता.