नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरी प्रकरणात एका अट्टल आरोपीस जेरबंद केले आहे. त्याला अटक केल्याने चौदा गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तो अभिलेखा वरील गुन्हेगार असून त्याच्या वर या पूर्वी तब्बल ९२ गुन्हे दाखल आहेत. चोरीचे वाहन विक्री साठी आल्यावर त्याला सापळा रचून अटक केली आहे.

नासीर सद्दन खान असे अटक आरोपीचे नाव आहे. चाळीस वर्षांपासून तो दुचाकी दुरुस्तीचे काम करत असून आता पर्यंत अनेक गॅरेज मध्ये त्याने काम केले . शिवाय स्वतः त्याने गॅरेज थाटले होते.

नवी मुंबई परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढ होत असल्याने आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उकल न झालेल्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे देत कसून तपास करण्याचे आदेश दिले होते. अनेक महिन्यांच्या प्रयत्नाने पोलिसांच्या हाती एक अट्टल गुन्हेगार लागला असून त्याच्या अटकेने चौदा गुन्ह्यांची उकल झाली आहे.

त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले, पोलीस निरीक्षक मंगेश वाट, सचिन शिंदे, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस नाईक सतिश चव्हाण, निलेश किंदे, नवनाथ पाटील, पुजा वैदय यांचे पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने अभिलेखावरील आरोपींचा तपास सुरु केला होता. शिवाय गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या घटनास्थळाचे परिसरातील सीसीटिव्ही फुटेजेसची पाहणी करून तांत्रिक माहिती उपलब्ध केली. तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून गुन्हयातील अभिलेखावरून आरोपी हा वाशी परिसरात चोरीचे वाहन घेवुन येणार असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस पथकासह सापळा रचण्यात आला. या सापळ्यात आरोपी नासिर अलगद अडकला.त्याने खारघर येथे केलेल्या वाहन चोरीची कबुली दिली. त्याला अटक करून चौकशी केली असता अन्य तेरा गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. आरोपीकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तांत्रिक तपासावरून अटक आरोपीकडुन नवी मुंबई परिसरामधील ५ लाख ८२ हजार रुपयांची १७चोरीची वाहने हस्तगत करून १४ गुन्हे उघडकीस आणले असुन उर्वरीत ३ बेवारस वाहनांचा मालकांचा शोध घेणे चालु आहे.

अटक संशयित आरोपी नासेर सद्दन खान अभिलेखावरील आरोपी असुन त्याचेवर यापुर्वी ९२ हुन अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नासिर याचे यापुर्वी गॅरेज असल्याने त्याला वाहनांची संपूर्ण माहिती असुन तो वाहनांची चोरी करून त्यावरील इंजिन क्रमांक व चेसीस क्रमांक खोडुन सदर वाहनांची ओळख पुसुन ती वाहने विक्री करण्याचे काम करीत होता. आरोपीने चोरी केलेली १७ वाहने गुन्हयाचा तपासादरम्यान जप्त करण्यात आली आहेत. तसेच अटक आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने चोरीच्या वाहनावरील इंजिन व चेसीस क्रमांक खोडुन ते नष्ट केल्याने हि वाहने कोणाची याचाही शोध घेण्यात येत आहे. तसेच आरोपीने मोटार सायकलवरील इंजिन व चेसीस क्रमांक खोडण्यासाठी वापरलेले साहित्य देखील गुन्हयाचा तपासात हस्तगत करण्यात आले आहे.