नवी मुंबई : ‘भारती अॅक्सा’ जीवन विमा पॉलिसी बंद करण्याच्या नावाखाली नागरिकाची तब्बल ६१ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी दिल्लीतील जाफराबाद परिसरातून एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय सायबर टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दिनांक १ जुलै २०२५ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधून स्वतःला विमा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. पॉलिसी बंद करण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली ‘एजंट कोड’, ‘बीटीसी कोड’, कागदपत्र प्रक्रिया आणि कॅश कन्व्हर्जन अशा विविध बहाण्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास प्रवृत्त करण्यात आले. या कालावधीत फिर्यादीकडून एकूण ६१,४५,५८० रुपये इतकी रक्कम उकळण्यात आली. मात्र कोणतीही वैध प्रक्रिया पूर्ण न करता ही रक्कम परत न देता फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपासादरम्यान सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा मोबाईल क्रमांक आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला. त्यातून आरोपीचे ठिकाण दिल्लीतील जाफराबाद परिसर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकून शाहरूख मेहताब खान याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने अन्य साथीदारांसोबत संगनमत करून कॉल सेंटर पद्धतीने नागरिकांना फसवण्याचे काम केल्याची कबुली दिली असून या कामाच्या मोबदल्यात त्याला आर्थिक लाभ मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या निरीक्षणाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, विमा पॉलिसी बंद करण्याच्या नावाखाली अनोळखी कॉल, मेसेज किंवा ई-मेल आल्यास नागरिकांनी कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करू नये. अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी थेट संपर्क साधूनच खातरजमा करावी, असे आवाहन नवी मुंबई सायबर पोलिसांनी केले आहे.
