नवी मुंबई: गॅस देयक भरले नसल्याने पुरवठा बंद करण्यात येईल अशी भीती दाखवून मोबाईल एक्सेस स्वतःकडे घेत गॅस धारकाच्या खात्यातून सर्व रक्कम काढून घेणाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल यांच्यात युद्ध सुरु असल्याने भारतात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्यांच्या घरी नैसर्गिक गॅस पाईप लाईन आहे ते सुखी आहेत असे म्हटले जाते.
मात्र आपलाही गॅस पुरवठा बंद होईल अशी भीती त्या गॅस ग्राहकांनाही वाटत आहे. याच भीतीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार फसवणूक करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गॅस देयक दिले नाही, अनामत रक्कम भरली नाही , देखभाल दुरुस्ती बाकी आहे अशा कारणांनी संदेश पाठवून भीती दाखवून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा संदेश कडे दुर्लक्ष करून थेट पुरवठा कंपनीशी संपर्क करून खातरजमा करावी असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे.
त्यात खास करून अनोळखी व्यक्तीने पाठवलेली कुठलीही लिंक वा फाईल ओपन करू नये अशा सूचनाही वेळोवेळी पोलीस विविध माध्यमातून देत असतात. तरीही अशी फसवणूक होते असाच प्रकार नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे उघडकीस आला आहे. कोपरखैरणेत राहणारे अजय क्रिश्चन या ७२ वर्षीय जेष्ठ नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. ३१ मार्चला रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांच्या पत्नीच्या मोबाईल व्हाटस अप वर एक संदेश आला होता.
त्यात गॅस देयक भरले नसल्याने पुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. हा संदेश महानगर गॅस कंपनी तर्फे दिला गेल्याचे सांगण्यात आले होते. देयक तात्काळ देण्यासाठी म्हणून आरोपीने MGLBILLLLUPDATE.apk नावाची फाईल पाठवली. हि फाईल डाउनलोड करून देयक अदा करा असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे अजय यांनी केले. काही वेळाने त्यांना क्रेडिट कार्ड आणि बँक खात्यातून संदेश आला त्यानुसार एकूण २ लाख २३ हजार ३३८ रुपये एका अनोळखी बँक खात्यात वळती झाले होते.
हि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अजय यांनी याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात संपर्क केलेल्या दोन व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महानगर गॅसचा म्हणून जो ऍप डाऊन लोड करण्यास सांगितला गेला. त्या द्वारे मोबाईल एक्सेस संशयित आरोपी कडे गेला. त्या द्वारे आरोपींनी बँक आणि क्रेडिट कार्ड मधील पैसे स्वतःच्या खात्यात वळती करून घेतले आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने काहीही धमकी दिले काही सांगितले आमिष दाखवले तर त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन हि पोलिसांनी केले आहे.
