पालिका आयुक्तांच्या प्रस्तावांना विषयपत्रिकेवर स्थान नाही

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे शहराच्या विकासात अडथळे उभे रहात असल्याची ओरड एकीकडे नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींनी सुरू केली असताना गुरुवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर मुंढे यांनी मांडलेल्या एकाही विकास प्रस्तावास स्थान देण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंढे यांच्या स्वाक्षरीने मांडण्यात आलेले विविध कामांचे कोणतेही विषय पत्रिकेवर घ्यायचे नाहीत, अशी स्पष्ट भूमिका महापौर सुधाकर सोनावणे यांनी घेतल्याने महापालिकेत अभूतपूर्व असा तिढा उभा राहिला आहे.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधींमधील संघर्ष शिगेला पोहचला असून त्याचे स्पष्ट परिणाम शहरातील विकासकामांवर दिसू लागले आहेत. मागील तीन महिन्यांपासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुंढे यांच्यात खटके उडू लागले आहेत. त्यामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभाही वारंवार तहकूब होऊ लागली आहे. या काळात मुंढे यांनी शहरातील विकासकामांचे सुमारे ११० कोटी रुपयांचे विविध प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी पाठविले आहेत. कोणतेही विकासकाम मार्गी लावताना प्रथमच संबंधित कामाच्या खर्चास सर्वसाधारण सभागृहाची प्रशासकीय मंजुरी आवश्यक असते. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास कामांच्या निवीदा काढून त्या पुढे स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येतात आणि त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असते. मुंढे यांनी शहरातील विकासकामे तसेच रुग्णालयात महत्त्वाच्या उपकरण खरेदीचे अनेक प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवले आहेत. मात्र, यापैकी अनेक प्रस्ताव अद्याप सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यापैकी काही प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्याची तयारी प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

गुरुवारची सभाही प्रस्तावाविना

मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजुर झाल्यानंतर गुरुवारी प्रथमच सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत एकाही विकासकामाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही. या सभेत नगरसेवकांनी मांडलेले काही ठराव, प्रश्न तसेच मागील सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. मुंढे यांनी सर्वसाधारण सभेपुढे मांडलेल्या एकाही महत्त्वाच्या प्रस्तावाला विषयपत्रिकेवर ठेवलेले नाही. आयुक्तांनी मांडलेले कोणते विषय विषयपत्रिकेवर घ्यायचे यासंबंधीचे पूर्ण अधिकार महापौरांना असतात. मुंढे यांच्या स्वाक्षरीने आणलेला एकही प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडायचा नाही, असा अघोषीत फतवाच यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काढल्याचे चित्र असून यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांत अस्वस्थता आहे. आयुक्तांनी मांडलेले विकासकामांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात असतील तर शहराचा विकास कसा होणार असा सवालही यानिमित्त उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात महापौरांशी संपर्क होऊ शकला नाही.