नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि समकालीन विचारांचा अभ्यास करण्याची संधी आता नवी मुंबईत उपलब्ध झाली आहे. ऐरोली सेक्टर १५ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या एक वर्षाच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी २० ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. शनिवार आणि रविवारी वर्ग होणार असून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून हा अभ्यासक्रम करता येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम राबविला जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दोन सत्रांमध्ये अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी घेतलेल्या व्यक्तींना प्रवेशासाठी अर्ज करता येणार असून वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
सामाजिक न्याय, अर्थविचार आणि समकालीन प्रश्नांचा अभ्यास
पहिल्या सत्रात सामाजिक न्याय, डॉ. आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विचार, त्यांच्या विचारांचा समकालीन प्रश्नांशी असलेला संबंध, ‘जातिनिर्मूलन’, आर्थिक विचार आणि संशोधन पद्धती या विषयांचा समावेश आहे. दुसऱ्या सत्रात या विषयांचा पुढील स्तरावर अभ्यास करण्याबरोबरच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा विषय शिकविला जाणार आहे. आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचा पुढील भाग आणि क्षेत्रकार्य किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रशिक्षणाचाही अभ्यासक्रमात समावेश आहे.
अभ्यासक्रमाचे वर्ग ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील जे. पी. नाईक भवन येथे होणार आहेत. अभ्यासक्रमाचे मूल्यांकन आणि प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडून दिले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक प्रा. वाल्मीक के. सरवदे यांच्या नियंत्रणाखाली अभ्यासक्रमाचे कामकाज सुरू आहे.
प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून इच्छुकांना muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. अभ्यासक्रमाबाबत अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या कार्यालयाशी ९३७२७३४२४७ किंवा ७३५०४०८६८६ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नवी मुंबई महानगरपालिकेचे समाजसेवक दशरथ गंभीरे यांच्याशी ९७०२३०९०५४ या क्रमांकावरही संपर्क करता येणार आहे.
पदवीधरांना कोणत्याही शाखेतून या अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येत असल्याने सामाजिक शास्त्रांव्यतिरिक्त इतर शाखांतील विद्यार्थ्यांनाही आंबेडकरी विचारांचा शैक्षणिक पद्धतीने अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. २० ऑगस्ट ही प्रवेशाची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांना त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
