नवी मुंबई : शहरातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी विशेष पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत शहरभरातून तब्बल ६६३ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, सर्व नमुने भारतीय मानक ब्युरो (BIS) आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण अभियांत्रिकी संघटना (CPHEEO) यांच्या निर्धारित निकषांनुसार योग्य आढळल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभाग, मोरबे विभाग, संबंधित विभागीय अधिकारी तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेचे कंत्राटदार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
शहरातील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रापासून बेलापूर ते दिघा या विभागांपर्यंतच्या मुख्य जलवाहिन्यांवर आणि विविध नोड्समध्ये प्रत्यक्ष पाहणी करून नमुने गोळा करण्यात आले. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून ७२ नमुने, मुख्य जलवाहिन्यांमधून ९६ नमुने तर बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या विभागांतून ४९५ नमुने तपासण्यात आले.
तपासणीदरम्यान पाण्याचे pH मूल्य, एकूण विरघळलेले घटक (TDS), अवशिष्ट क्लोरीन आणि गढूळपणा या घटकांची तपासणी करण्यात आली. पाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतर नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याची गुणवत्ता मानकांनुसार असल्याचे निष्कर्ष तपासणीतून समोर आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये पाण्याला दुर्गंधी येणे, गढूळ पाणीपुरवठा होणे किंवा पाण्याच्या रंगात बदल दिसून येणे अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही विशेष मोहीम राबवून विविध स्तरांवर पाणी गुणवत्तेची पडताळणी केली आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली शंका दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
महापालिकेने नागरिकांना सध्या शहरात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगितले असून, पाणी गुणवत्तेबाबत नियमित तपासणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधित विभाग कार्यालयाशी किंवा महापालिकेच्या १८००२२२३०९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी तपासणी मोहिमेतील आकडे
- भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र : ७२ नमुने
- मुख्य जलवाहिन्या : ९६ नमुने
- शहरातील विविध नोड्स : ४९५ नमुने
- एकूण तपासणी : ६६३ नमुने
