नवी मुंबई : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात सक्रिय असलेल्या महिला तस्करांविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. तुर्भे, दिघा, नेरूळ आणि पनवेल परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीत गुंतलेल्या चार महिला आरोपींवर पीआयटी एनडीपीएस आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. वारंवार गुन्हे दाखल होऊनही अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या या महिलांना वेगवेगळ्या कारागृहांत स्थानबद्ध करण्यात आल्याने त्यांच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.
तुर्भेनाका येथील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या नसीम बानो ऊर्फ लाली गनी शेख हिच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार यापूर्वी पाच गुन्हे दाखल आहेत. वारंवार गांजाची विक्री करूनही तिच्या अवैध व्यवसायाला आळा बसत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे तिच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पीआयटी एनडीपीएस कायद्यांतर्गत तिला स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर तिची रवानगी पुणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
दिघा परिसरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय चालविणाऱ्या शांताबाई करंडेकर हिच्याविरुद्धही पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. तिच्याविरुद्ध एकूण आठ गुन्हे दाखल असून, परिसरात दहशतीच्या जोरावर अमली पदार्थांचे जाळे चालविल्याचा आरोप आहे. तिची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
नेरूळ परिसरातील सीताबाई इंगळे हिच्याविरुद्ध पीआयटी एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, तिला नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर पनवेल येथील राणी जोसेफ हिच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून तिला तळोजा कारागृहात पाठविण्यात आले आहे.
अमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार गुंतलेल्या आरोपींविरुद्ध केवळ गुन्हे दाखल करण्यापुरती कारवाई न करता, त्यांच्या अवैध व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी स्थानबद्धतेसारख्या कठोर उपाययोजना पोलिसांकडून केल्या जात आहेत. चार महिला आरोपींवरील या कारवायांमुळे शहरातील अमली पदार्थविरोधी मोहिमेला अधिक गती देण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
या कारवाईत अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक जगताप, हवालदार राठोड आणि मारुती शिंदे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
