उद्योजक : के. के. मॅथ्यू

केरळमधील कुन्नूर या एका खेडय़ातून मुंबईत नोकरीनिमित्त आलेल्या एका तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिमेन्स, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, गोदरेज, बॉश यासारख्या बडय़ा कंपन्यांना लागणारी यंत्रसामग्री तयार करून देण्याचे शिवधनुष्य गेली अनेक वर्षे पेलले आहे. यशाच्या मागे न पळता ध्येयाचा पाठपुरावा केल्यास यश नक्कीच मिळते, या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या के. के. मॅथ्यू यांच्या पेट टुल्स प्रा. लिमिटेड या इंजिनीअरिंग यंत्रसामग्री बनविणाऱ्या कंपनीने अल्पावधीतच औद्योगिक वसाहतीत स्वतचे खास स्थान निर्माण केले आहे. कंपन्यांना लागणारे अभियांत्रिकी साहित्य पुरवण्यात पेट टुल्स अग्रेसर आहे.

कन्नूरसारख्या गावात शेती करणाऱ्या कुटुंबात मॅथ्यू यांचा जन्म झाला. उद्योगाची कोणतीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसलेल्या मॅथ्यू कुटुंबातील या मुलाला बालपणापासून यंत्रसामग्रीचे आकर्षण होते. शाळेत जाताना अनेक विद्यार्थी रस्त्यात टिंगलटवाळी करत, पण मॅथ्यू रस्त्याने ये-जा करणाऱ्या मळकट कपडे घातलेल्या वर्कशॉपमधील कामगारांना न्याहाळत असे. हे कामगार काय करत असतील असा प्रश्न नेहमी त्याला पडे. शालेय वयातच याविषयीचे कुतूहलमिश्रित आकर्षण मॅथ्यूच्या मनात निर्माण झाले. तेव्हापासून त्याचे यंत्रांशी बंध जुळले ते कायमचेच.

केरळमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची खासगी पदविका धारण केल्यानंतर हा तरुण नशीब अजमावण्यासाठी थेट मुंबईत आला. प्रारंभी उमेदवारी करताना १०-१२ छोटय़ा मोठय़ा अभियांत्रिकी कारखान्यांत त्याने नोकरी केली. अभियांत्रिकी क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याचे अकर्षण या तरुणाला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे कांजुरमार्ग येथील कर्तार कंम्पाऊंडमध्ये महिना एक हजार रुपये भाडय़ावर त्यांनी एक कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत आवश्यक यंत्रसामग्रीही होती. दरम्यान नोकरीही सुरू होती. नोकरी आणि वर्कशॉप असा दुहेरी संर्घष सुरू झाला.

याचवेळी गोदरेजच्या टंकलेखन यंत्रासाठी लागणारे एक छोटे प्रायमा यंत्र बनविण्याचे उपकंत्राट या तरुणाला मिळाले. लहानपणापासून यंत्रावर जीवापाड प्रेम असलेल्या मॅथ्यू यांनी रात्रीचा दिवस करून ते यंत्र तयार केले. केवळ ७५ रुपयांसाठी तयार करण्यात आलेल्या या यंत्राचे काम त्यांना मोठा आत्मविश्वास देऊन गेले. त्यानंतर मॅथ्यू यांनी मागे वळून पाहिले नाही. सिप्ला या कंपनीत देखभाल आणि दुरुस्तीची कामे मिळू लागली. इलेक्ट्रिक क्षेत्रात नामांकित असलेल्या केईसी या कंपनीने एक रोलर प्रकारातील यंत्र बनविण्याचे काम मॅथ्यू यांना दिले. हे काम पेट टुल्सने मोठय़ा हिमतीने केल्याने त्यानंतर त्यांना मोठे रोलर बनविण्याचे काम मिळाले. त्यावेळी राजस्थानमधील एका कंपनीची या क्षेत्रात मक्तेदारी होती. त्यांनी या यंत्रणेसाठी दुप्पट दर आकारला होता आणि त्याचवेळी मॅथ्यू यांच्या पेट टुल कंपनीने निम्म्या दरात हे काम करून दिले. त्यामुळे पेटची विश्वासार्हता वाढली.

अमेरिका, जर्मनीतून आवश्यक कच्चा माल आणून पेट सध्या सिमेन्स, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, गोदरेज, बॉश यासारख्या बडय़ा कंपन्यांना लागणारी यंत्रसामग्री बनवून देते. कोणत्याही क्षेत्रात काम करताना प्रचंड जिद्दीची गरज असल्याचे मॅथ्यू सांगतात. यशस्वी उद्योजक होण्यासाठी खूप त्याग करावा लागतो, असा त्यांचा अनुभव आहे. भारतात केवळ एकमेकांचे पाय खेचण्याचे काम केले जात असून सोबत असलेल्या सहकाऱ्यांना साथ देण्याची वृत्ती आहे, त्यामुळे भारतात चांगले उद्योजक निर्माण होत नाहीत, अशी खंत मॅथ्यू यांनी व्यक्त केली.

अपयशावर मात

परदेशी कंपन्यांना गुणवत्ता आवडत असल्याने आज बॉशशी संलग्न असलेल्या एका कंपनीला यंत्रसामग्रीचा पुरवठा करताना एक टक्का देखील माल परत येत नाही, मात्र अंबरनाथमधील याच कंपनीला २० वर्षांपूर्वी अभियांत्रिकी साहित्य पुरवताना ४० टक्के माल परत येत असल्याची आठवण ते सांगतात. त्यावेळी हा कारखाना चालविण्यासाठी पठाणाकडून व्याजाने कर्ज घ्यावे लागल्याचे ते सांगतात. आज गुणवत्तेवर लक्ष पूर्णपणे केंद्रित केल्यामुळे आणि दर्जाला सर्वोच्च महत्त्व दिल्यामुळेच आपल्या यंत्र आणि साहित्याला देश- विदेशांत मोठी मागणी आहे, असे ते आत्मविश्वासाने सांगतात. गुणवत्ता आणि योग्य पुरवठय़ामुळे आजच्या घडीला युरोपमधील अनेक देशांत पेट टुल्सचे साहित्य पुरविले जात आहे.

गुणवत्ता, सातत्य आणि विश्वासार्हतेला प्राधान्य

रबाले येथील अतिरिक्त एमआयडीसीच्या आर ८९९ क्रमांकाच्या कारखान्यात ३० कामगारांच्या साहाय्याने अभियांत्रिकी साहित्याची निर्मिती केली जाते. गुणवत्ता, सातत्य आणि विश्वासार्हतेला प्राधान्य दिल्यामुळे २०१३ मध्ये बॉश कंपनीचा बेस्ट वेन्डर पुरस्कार पेट टुल्सला प्रदान करण्यात आला. गोदरेज कंपनीने देखील ‘पेट’ला पुरस्कर देऊन गौरविले आहे. व्यवसाय म्हणजे २४ तासांची नोकरी असल्याची जाणीव असलेल्या तरुणांनीच उद्योजक म्हणून पुढे यावे, असा सल्ला मॅथ्यू देतात.