कॉर्पोरेट कार्यालये, मोठमोठे मॉल, कारखाने, रुग्णालय आणि काही बडय़ा घरांनाही लागणाऱ्या सेंट्रल वातानुकूलित यंत्रणा बसवायची, पण त्यातील हवेचा प्रवाह सगळीकडे सारखाच खेळता राहावा यासाठी लागणारे ‘डिफ्युजर’ बनविण्याचे काम रबाळे आणि महापेतील ‘सचिनस इम्पेक्स’ कंपनी गेली २८ वर्षे करीत आहे. एका अल्युमिनियमच्या शीटमध्ये विनाजोड ‘डिफ्युजर’ बनविण्याचा मान ‘सचिनस’कडे असल्याने ही कंपनी अमेरिका, ब्राझील आणि संपूर्ण आखाती देशात एकसंध ‘डिफ्युजर’ पुरवठा करीत आहे. व्होल्टाससारख्या एका बडय़ा कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन ‘सचिनस इम्पेक्स’चे संस्थापक रमेश म्हात्रे यांनी उभा केलेला हा उद्योग रंजक आणि तेवढाच प्रेरणादायी ठरणारा आहे.

अलिबागमधील बागदंडा गावातून आलेल्या म्हात्रे यांनी जिद्द, कष्ट आणि विश्वासार्हतेच्या बळावर आज ‘डिफ्युजर’ क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. शेतकरी कुटुंबातील म्हात्रे यांच्या घरची आर्थिक स्थिती बेताची असलेल्या त्यांनी शिक्षण आणि नोकरी एकाच वेळी करता यावी, म्हणून ५३ वर्षांपूर्वी मुंबई गाठली. दादरला काकाकडे राहून एका गाडय़ांच्या बॉडी बनविणाऱ्या गॅरेजमध्ये काम स्वीकारले. गॅरेजमध्ये ते जीवतोड मेहनत करायचे. दिवसभर घनाचे घाव घालून हाताला फोड येऊनही दुसऱ्या दिवशी कामावर जाऊन सहकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का देणाऱ्या म्हात्रे यांनी रात्रशाळेत जाऊन शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर व्होल्टासमध्ये बोलावणे आले. १८ वर्षे व्होल्टासची सेवा केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला. ‘डिफ्युजर’ वा ‘डाय’ बनविण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. याचदरम्यान त्यांनी एक छोटा सहउद्योग सुरू केला. तो फार मजेशीर आणि वेगळेपण सिद्ध करणारा ठरला. एक दिवस म्हात्रे यांना एका अभियंत्याने स्टोअर रुममधून मार्किंग स्लेट आणण्यास सांगितले. म्हात्रे स्टोअर रुममध्ये गेल्यानंतर त्यांना मार्किंग स्लेट म्हणून पांढऱ्याशुभ्र शिंपल्या हातात देण्यात आल्या. त्या वेळी अनेक कारखान्यांत रेषा मारण्यासाठी या शिंपल्या वापरल्या जात होत्या. समुद्रकिनारी बालपण गेलेल्या म्हात्रे यांना शिंपल्या धरणे चांगलेच अवगत होते. त्यांनी त्या शिंपल्यांचा पुरवठा करण्याची परवानगी व्होल्टासच्या अधिकाऱ्यांकडून मिळवली आणि सुरू झाला एक लघुउद्योग. त्यामुळे म्हात्रे यांना मुंबईत रेघवाला अशीही ओळख मिळाली. प्रति किलोमागे दोन रुपये मिळत असल्याने म्हात्रे यांनी शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी या शिंपल्यांचा व्यवसाय करण्यासाठी मुंबई पालथी घातली. त्यासाठी भाडय़ाने एक सायकल घेऊन डोंबिवली, बोरिवलीपर्यंतची पायपीट केली. ‘म्हात्रे इंटरप्राईजेस’ नावाने या व्यवसायाचा श्रीगणेशा झालेला असतानाच १९८४ मध्ये ठाण्यातील ‘अमर गॅन इंड्रस्ट्रिज’मध्ये डाय बनविण्याचा कारखाना सुरू केला. १९८८ मध्ये सिमेन्स कंपनीने एक चांगली संधी दिल्यानंतर व्होल्टास कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन या व्यवसायाचा विस्तार करण्याचे आव्हान म्हात्रे यांनी स्वीकारले. त्याच काळात दुबईहून केवळ मशिनरी बघण्यासाठी आलेल्या अब्दुल सलाम या अरब नागरिकाला म्हात्रे यांच्या कंपनीतील डाय अत्यंत आवडली. त्यासरशी त्याने म्हात्रे यांना डायनिर्मितीसाठी दहा लाख २७ हजारांची पहिली ऑर्डर दिली. त्यानंतर म्हात्रे यांनी मागे वळून पाहिले नाही.

म्हात्रे यांच्या दुबई वाऱ्या सुरू झाल्या. त्या वेळी सेंट्रल एसीसाठी लागणारे डिफ्युजर बाजारात तर उपलब्ध होते; पण एका साच्यात बनविलेला ‘डिफ्युजर’ मिळत नव्हता. त्यामुळे अनेक कंत्राटदार हे ‘डिफ्युजर’ नाकारत होते. या ‘डिफ्युजर’मध्ये असलेल्या सांध्यामुळे त्यात बसलेली धूळ आणि कचरा दिसून येत होता. म्हात्रे यांनी दुबईतच एकसंध ‘डिफ्युजर’ बनविण्याचा निर्धार केला आणि मुंबईत आल्यावर त्याच्या उत्पादनास सुरुवात केली. त्यासाठी लागणारा कच्चा माल घेण्यास ५५ लाख रुपये उपलब्ध होऊ शकले नाहीत. शेवटी बाजारातून व्याजावर पैसे घेऊन ‘डिफ्युजर’चा नमुना बनविला. आज आखाती देशांना ‘सचिनस’चा ‘डिफ्युजर’ थंडावा देत आहे, तो म्हात्रे यांच्या कल्पकतेमुळे.

‘डिफ्युजर’चे जागतिक पेंटट म्हात्रे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना ‘डिफ्युजर मॅन’ म्हणून संबोधले जाते. वयाची सत्तरी पार केलेले म्हात्रे आजही तरुणांना लाजवेल असे काम करीत आहेत. त्यांचा मुलगा सचिन याच्याकडे व्यवसायाची सध्या धुरा आहे. शेतकरी कुटुंबातून एक यशस्वी उद्योजक झालेल्या म्हात्रे यांची यशोगाथा आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरणारी आहे.