नवी मुंबई : देशभरात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असताना नवी मुंबईत आयुक्तांच्या नावाने आर्थिक मदतीची मागणी करणारे बनावट संदेश प्रसारित होत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे छायाचित्र व ‘Kailash Shinde’ या नावाने सेव्ह केलेल्या मोबाईल क्रमांकावरून काही नागरिकांना आर्थिक मदतीसाठी संदेश पाठविण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त किंवा पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारे आर्थिक मदतीची मागणी केली जात नाही. त्यामुळे संबंधित संदेश पूर्णपणे बनावट असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

काय काळजी घ्यावी?

सायबर गुन्हेगारांकडून अधिकाऱ्यांचे फोटो, नाव किंवा पदाचा वापर करून विश्वासार्हता निर्माण केली जाते. अशा वेळी अनोळखी क्रमांकावरून आलेले संदेश, ‘तत्काळ पैसे पाठवा’ अशा स्वरूपाचे आवाहन किंवा वैयक्तिक खात्यावर रक्कम जमा करण्याची विनंती आल्यास सावध राहणे आवश्यक आहे. कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाशी अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून खात्री करावी.

संशयास्पद संदेश, फेक कॉल किंवा ऑनलाईन फसवणूक झाल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच केंद्र सरकारच्या सायबर गुन्हे तक्रार संकेतस्थळावर (www.cybercrime.gov.in) किंवा हेल्पलाईन क्रमांक १९३० वरही संपर्क साधता येतो.

नागरिकांनी समाज माध्यमांवर अशा संदेशांचे पुढे प्रेषण न करता त्याची सत्यता तपासावी. सतर्कता, पडताळणी आणि अधिकृत स्रोतांवर विश्वास हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी असल्याचे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यानिमित्ताने नमूद केले आहे.