लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) योजनेंतर्गत पात्र कामगारांची संख्या नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर आहे. असे असूनही या ठिकाणी ईएसआयसीचे रुग्णालय नसल्याने उपचारांसाठी या कामगारांना खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी जावे लागते. यावर तोडगा म्हणून नवी मुंबईत पनवेल येथे ईएसआयसी रुग्णालय काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी शिरढोण येथील पाच एकर जागेचे हस्तांतरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

विधान परिषदेत भाजप सदस्य विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे नवी मुंबई परिसरात ईएसआयसी रुग्णालयाची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित केला. नवी मुंबईची लोकसंख्या २५ लाखांवर आहे. पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा आणि इतर भागांत राहणाऱ्या कर्मचारी, कामगारांची संख्या पाच लाखांवर पोहोचली आहे. असे असले तरी नवी मुंबईत ईएसआयसी रुग्णालय नाही. त्यामुळे या कामगारांना वैद्यकीय उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात पैसे खर्च करावे लागतात. ईएसआयसी नवी मुंबईत रुग्णालय बांधण्यास तयार आहे, त्यामुळे राज्य सरकारने त्यांना जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर राज्यमंत्री योगेश कदम यांनी पनवेलजवळ १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी ईएसआयसीने राज्य सरकारला जमीन मागितली आहे. म्हणून आम्ही तळोजा येथे काही जमीन प्रस्तावित केली होती. परंतु ईएसआयसी समितीने त्या जागेला भेट दिल्यानंतर आम्हाला कळवले की ती जमीन रुग्णालयासाठी उपयुक्त ठरणार नाही. म्हणून आता आम्ही शिरढोण येथे जमीन ओळखली आहे. ही २ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याची मंजुरीची प्रक्रिया एका महिन्यात सुरू केली जाईल, अशी माहिती दिली. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही ईएसआयसी रुग्णालयासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी एमआयडीसी किंवा महसूल विभागाकडून जमीन दिली जाईल, असेही कदम म्हणाले.