नवी मुंबई : ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत दरवर्षी मोठ्या थव्यांनी येणाऱ्या फ्लेमिंगो (रोहित पक्षी/अग्निपंख) यांची यंदा अद्याप प्रतीक्षा कायम आहे. मात्र, नेरूळमधील टी.एस. चाणक्य परिसरातील पाणथळ भाग विविध स्थलांतरित पक्ष्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले आहेत.
मेरिटाइम विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या या पाणथळ भागात २ आणि ३ एप्रिल रोजी स्थानिक पक्षीनिरीक्षक व वन्यजीव छायाचित्रकार डॉ. अरुण कुऱ्हे यांनी सकाळच्या सत्रात निरीक्षण करताना सुमारे ५०० पक्ष्यांची नोंद केली. या वेळी पाणकावळा (कॉर्मोरंट), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), शेकाट्या (सँडपायपर), टीलवा (ब्लॅक-विंग्ड स्टिल्ट), तुतारी (कर्ल्यू), चमचा (स्पूनबिल), आयबिस, प्लोव्हर, विविध प्रकारचे टर्न (सुरय) आणि सागरी कुरव (सीगल) यांसह अनेक पाणपक्षी मोठ्या संख्येने आढळले. याशिवाय बगळे, लाल मुनिया, खवलेदार छातीचा मुनिया, करड्या डोक्याची मैना (स्टार्लिंग) आणि कवड्या खंड्या यांसारखे पक्षीही येथे दिसून आले. त्यामुळे पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
फ्लेमिंगो दरवर्षी प्रामुख्याने कच्छच्या रणातून मुंबई-नवी मुंबईकडे स्थलांतर करतात. यंदा उशिरा व दीर्घकाळ चाललेल्या मान्सूनमुळे कच्छमध्ये पाण्याची पातळी जास्त काळ टिकून राहिली. त्यामुळे शैवालासारखा अन्नस्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला. प्रजननासाठीही अनुकूल वातावरण तयार झाल्याने अनेक फ्लेमिंगो तिथेच थांबले असल्याच पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. परिणामी, नवी मुंबईत त्यांच्या आगमनाला विलंब झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर पुढील काही आठवड्यांत फ्लेमिंगो नवी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत, इतर विविध स्थलांतरित पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे शहरातील पाणथळ भाग जैवविविधतेने समृद्ध असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
फ्लेमिंगोंची संख्या अत्यल्प
फ्लेमिंगोंची संख्या मात्र यंदा अत्यल्प असून, वेगवेगळ्या दिवशी केवळ १५ ते २० पक्षीच दिसून आल्याचे निरीक्षण आहे. साधारणपणे डिसेंबर ते मे या कालावधीत हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो नवी मुंबईतील पाणथळ भागात वास्तव्यास असतात. त्या तुलनेत यंदाची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. यामुळे पक्षीनिरीक्षणासाठी येणाऱ्या निसर्गप्रेमींची गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.
यंदा फ्लेमिंगोंची संख्या कमी असली तरी नेरूळ परिसरातील पाणथळ भागात इतर स्थलांतरित पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर नोंद होत आहे. त्यामुळे जैवविविधतेचा समृद्ध अनुभव येथे मिळत असून, पक्षीनिरीक्षकांसाठी हा परिसर अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.- डॉ. अरुण कुऱ्हे, वन्यजीव छायाचित्रकार
