नवी मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर यंदाही शहरासमोर पूरस्थितीचे आव्हान उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. शहरातील धारण तलावांची साठवण क्षमता सुमारे ८० टक्क्यांनी घटल्याची माहिती यापूर्वीच आयुक्तांनी दिली असून धारण तलावातील गाळसफाईचे काम परवानग्यांअभावी रखडल्याचे आयुक्तांनी सांगितले. आवश्यक पर्यावरणीय आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून पुढील पावसाळ्यापर्यंत गाळसफाई पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.

नवी मुंबईची जलनिस्सारण व्यवस्था ही भौगोलिक रचनेमुळे विशेष स्वरूपाची आहे. शहराच्या एका बाजूला डोंगररांगा तर दुसऱ्या बाजूला समुद्र असल्याने मुसळधार पावसाच्या वेळी पाणी बाहेर जाण्यास मर्यादा येतात. भरतीच्या काळात समुद्रात पाणी सोडणे शक्य नसल्याने शहरात साचणारे पाणी तात्पुरते धारण तलावांमध्ये साठवले जाते. अशा प्रकारचे ११ धारण तलाव शहरात कार्यरत असून, हे तलाव जलनिस्सारण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक मानले जातात.

मात्र गेल्या काही वर्षांत या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचणे आणि कांदळवने वाढल्याने त्यांची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. आयआयटी, मुंबईच्या अभ्यासातून ही घट सुमारे ८० टक्क्यांपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास पाणी साचण्याचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी सुमारे २४४ हेक्टर क्षेत्रावर धारण तलाव उभारण्यात आले असून हे तलाव ‘स्पंज’प्रमाणे पाणी साठवण्याचे काम करतात. मात्र गाळ साचणे आणि कांदळवन वाढल्याने त्यांची क्षमता लक्षणीय घटली आहे. तलाव परिसरातील कांदळव हटवण्यासाठी वनखात्याची मंजुरी तसेच पर्यावरणीय व न्यायालयीन प्रक्रिया आवश्यक असल्याने गाळसफाईचे काम तातडीने सुरू करता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या सर्व परवानग्यांसाठी पाठपुरावा सुरू असून पर्यायी वनीकरणासाठी जागा शोधण्याचे कामही सुरू आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर वर्षभरात तलावांचे रुंदीकरण व गाळसफाई पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई ही महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नालेसफाईची कामे हाती घेतली जात असली तरी काही भागांत पाणी साचण्याच्या तक्रारी कायम राहतात. नाल्यांमध्ये साचणारा कचरा, अपूर्ण साफसफाई आणि नैसर्गिक प्रवाहातील अडथळे ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे निरीक्षण आहे.

यंदा नालेसफाईच्या कामांना वेग देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून प्रमुख नाल्यांच्या साफसफाईचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. आयुक्त स्वतः या सफाईकडे जातीने लक्ष देत असून, संबंधित विभागाकडून कामाचा आढावा घेत आहे. तरीही धारण तलावांची घटलेली क्षमता लक्षात घेता केवळ नालेसफाई पुरेशी ठरणार नाही, हे गेल्या काही वर्षांच्या अनुभवांवर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दीर्घकालीन उपाय म्हणून तलावांचे पुनरुज्जीवन आणि गाळसफाई महत्त्वाची ठरणार आहे.

६०-६५ टक्के काम पूर्ण

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांची साफसफाई सुरू असून या कामांना यंदा वेग आल्याचे प्रशासनाने सांगितले. नालेसफाईची आणि पावसाळपूर्व कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत सुमारे ६० ते ६५ टक्के नालेसफाई पूर्ण झाली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. उर्वरित कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या असून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

धारण तलावांमधील गाळ काढण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, हा गाळ काढण्याचे नियोजन प्रशासनाने हाती घेतले आहे. धारण तलावांमध्ये कांदळवन तयार झाल्याने वनखाते आणि सर्वोच्च न्यायालयाकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ते हटविण्याचे काम हाती घेतले जाईल. यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असून येत्या वर्ष-दीड वर्षात धारण तलावांचे रुंदीकरण करण्यात येईल. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नमुंमपा