आढावा बैठकीत महापालिका आयुक्तांचे आश्वासन

नवी मुंबई : जानेवारी, फेब्रुवारीमध्ये नवी मुंबईत होणाऱ्या ‘फिफा’ (१७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक) तसेच आशियाई करंडक स्पर्र्धेसाठी नवी मुंबईला यजमानपद भूषविण्याचा बहुमान प्राप्त झाला असून या दोन्ही स्पर्धाची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. या संदर्भात शुक्रवारी आढावा बैठक झाली. यात शहरातील मैदाने स्पर्धेसाठी सुसज्ज असतील, असा विश्वास या वेळी पालिका आयुक्तांनी दिली आहे.

या स्पर्धाच्या पूर्वतयारीबाबत विचारविनिमय करण्यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात ही विशेष बैठक झाली. याप्रसंगी महानगरपालिका क्रीडा विभागाचे उपआयुक्त मनोज महाले, या दोन्ही स्पर्धाचे प्रकल्प संचालक अंकुश अरोरा व नंदिनी अरोरा, होस्ट सिटी मॅनेजमेंट प्रमुख मनदीप सहारन, डी.वाय.पाटील क्रीडा संकुलाचे संचालक वृंदावन जाधव, महानगरपालिका क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी उपस्थित होते.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय डॉ. डी.वाय. पाटील मैदानात स्पर्धेतील प्रमुख सामने खेळवले जाणार आहेत. तर सरावासाठी फिफा आयोजन समितीने नवी मुंबईतील चार तसेच खारघरमधील २ मैदानांची निवड केली आहे. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर १९ नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण मैदानाचा समावेश आहे. या मैदानात यापूर्वी २०१७ मध्ये ‘फिफा’ १७ वर्षांखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेचे सराव झाले होते. त्या वेळी मैदानाची प्रशंसा झाली होती. तशाच प्रकारे या वेळीही मैदान असेल असा विश्वास या वेळी आयुक्तांनी दिला. तर फिफा आयोजकांच्या तांत्रिक समितीसह महापालिकेच्या क्रीडा व अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने १६ ऑगस्ट रोजी या मैदानाची संयुक्त पाहणी करावी आणि तेथील आवश्यक सुविधांचा आढावा घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.