नवी मुंबई : पामबीच मार्गावर फॉर्म्युला-४ कार रेससाठी विकसित करण्यात येणाऱ्या ट्रॅकच्या कामाचा खर्च ३९ कोटी ८३ लाख रुपयांवर पोहोचला आहे. मूळ निविदेच्या तुलनेत जवळपास आठ कोटी रुपयांची वाढ झाल्याने सुधारित खर्चाचा प्रस्ताव गुरुवारी (२९ ऑक्टोबर) होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.

प्रत्यक्ष कामादरम्यान जागेवरील तांत्रिक परिस्थिती आणि आराखड्यात करावे लागलेले बदल यामुळे अतिरिक्त कामे करावी लागल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे.

पामबीच मार्गावर फॉर्म्युला-४ कार रेससाठी ट्रॅक विकसित करण्यासह त्याअनुषंगाने आवश्यक कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या कामासाठी १२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या ठरावानुसार ३३ कोटी ७९ लाख ७१ हजार ३६३ रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून सर्वात कमी दराची निविदा सादर करणाऱ्या ‘ए. एम. स्वामी कन्स्ट्रक्शन’ या कंत्राटदाराला काम देण्यात आले. १८ टक्के वस्तू व सेवा करासह ३१ कोटी ९३ लाख ६० हजार २४४ रुपयांच्या निविदेला ६ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मान्यता देण्यात आली होती.

पामबीच मार्गावरील या प्रकल्पासाठी वाढीव खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावावर समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकल्पाच्या कामाचा मोठा टप्पा पूर्ण झाला असला, तरी सुधारित खर्चाची मंजुरी आणि उर्वरित कामाची मुदत यामुळे हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.

प्रत्यक्ष कामादरम्यान खर्चात वाढ

काम सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती आणि तांत्रिक गरजांनुसार मूळ आराखड्यात बदल करावे लागले. त्यामुळे निविदेत समाविष्ट असलेल्या काही कामांच्या प्रमाणात वाढ झाली, तर काही अतिरिक्त कामांचा समावेश करावा लागला. या बदलांमुळे मूळ निविदेच्या खर्चात वाढ झाल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

तफावतीबाबत स्पष्टीकरण आवश्यक

सुधारित खर्चाच्या तपशिलानुसार, जादा कामांसाठी ७ कोटी ४९ लाख ५९ हजार १६५ रुपये, तर अतिरिक्त कामांसाठी १ कोटी ३ लाख १६ हजार ८३५ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही रकमा एकत्र केल्यास ८ कोटी ५२ लाख ७६ हजार रुपये होतात. मात्र, प्रस्तावातील निव्वळ वाढीव रक्कम ७ कोटी ८९ लाख ६७ हजार ७३५ रुपये नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे खर्चाच्या तपशिलातील या तफावतीबाबत स्पष्टीकरण आवश्यक आहे. सुधारित प्रस्तावानुसार, या प्रकल्पाची निविदा रक्कम आता ३९ कोटी ८३ लाख २७ हजार ९७९ रुपये झाली आहे. मूळ निविदेच्या तुलनेत हा खर्च सुमारे २४.७ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सुधारित आर्थिक तरतुदीला स्थायी समितीची मान्यता मिळणे आवश्यक आहे.

तीन महिन्यांची मुदतवाढ

प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असले, तरी उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. वाढीव खर्चासह मुदतवाढीचा प्रस्तावही प्रशासनाने मंजुरीसाठी पुढे ठेवला आहे.