नवी मुंबई : नेरुळ येथील ज्वेल परिसरात होणाऱ्या फॉर्म्युला ४ नाईट रेसिंग स्पर्धेसाठी रस्ता दुभाजकावरील पथदिवे स्थलांतरित करण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी २१ लाख ६ हजार २३ रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच या कामाचा काही भाग प्रत्यक्षात करण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख समीर अमीन बागवान यांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात ९० नग आरसीसी पायाभरणी, सुमारे २,३९५ मीटर विद्युत केबल, २,०१५ मीटर वाहिनी तसेच ९० पथदिवे खांबांसाठी आवश्यक विद्युत यंत्रणेचा समावेश आहे. याशिवाय विविध प्रकारचे पथदिवे खांब आणि दिव्यांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे अंदाजपत्रकात नमूद केलेले प्रमाण आणि प्रत्यक्ष ठिकाणी करण्यात आलेले काम यांची मोजमापासह तांत्रिक पडताळणी करावी, अशी मागणी बागवान यांनी केली आहे.
यापूर्वी या परिसरात करण्यात आलेले पथदिव्यांचे काम, सध्या प्रस्तावित असलेले स्थलांतराचे काम आणि प्रत्यक्षात आवश्यक असलेले काम यांची तुलनात्मक तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यातून दुबार काम किंवा त्यासाठी दुबार खर्च झाला आहे का, हे स्पष्ट होऊ शकणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष कामाची मोजमाप नोंद, कामाचे आदेश, प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी तसेच संबंधित देयकांचीही तपासणी करावी, असे बागवान यांनी म्हटले आहे.
फॉर्म्युला ४ स्पर्धेसाठी पथदिवे स्थलांतरित करण्याची आवश्यकता आणि त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या खर्चाची तांत्रिकदृष्ट्या पडताळणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी प्रत्यक्ष काम करण्यात आले असल्याचे किंवा आर्थिक अथवा प्रशासकीय अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच सार्वजनिक निधीचे नुकसान झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून नुकसानाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“सार्वजनिक पैशातून होणाऱ्या कामात नियम, पारदर्शकता आणि तांत्रिक अचूकता अत्यावश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक बाब तपासून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे.” – समीर बागवान, उपशहर प्रमुख, शिवसेना (ठाकरे)
