नवी मुंबई : गणेशोत्सवात नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने यंदा १७० कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे अपेक्षित असून, मोठ्या मूर्तींसाठीही शक्यतो कृत्रिम तलावांना प्राधान्य देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांना घराजवळच विसर्जनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, नवी मुंबईतील पारंपरिक विसर्जनस्थळांवर गणेशोत्सवाच्या काळात मोठी गर्दी होते. ही गर्दी विभागली जाण्याबरोबरच नैसर्गिक जलस्रोतांचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणे परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागाने निश्चित केली असून तलाव उभारणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून मंडप परवानगीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक खिडकी पद्धतीची ऑनलाइन ई-सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यावरणाचे रक्षण करत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी शाडूच्या आणि पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करावा तसेच विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

कृत्रिम तलावांमुळे गणेशमूर्ती आणि निर्माल्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांवर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी समुद्र, खाडी किंवा अन्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याऐवजी घराजवळील कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शक्य असल्यास घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन करण्यासही प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे.

शाडूच्या मूर्तींचा आग्रह

गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. सजावटीमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळून कापड, कागद तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्णकर्कश ध्वनी टाळून मर्यादित आवाजात वाद्यांचा वापर करावा तसेच लेझर दिव्यांचा वापर टाळावा, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

विसर्जनस्थळांवर यंत्रणा

नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळांवर भाविकांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वयंसेवक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात केले जातील. आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध असेल. निर्माल्य संकलन आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून तराफे, फोर्कलिफ्ट यांसारखी यंत्रसामुग्रीही सज्ज ठेवण्यात येणार आहे.

कोठे किती कृत्रिम तलाव?

बेलापूर २२
नेरुळ २९

वाशी १६
तुर्भे २१

कोपरखैरणे १६
घणसोली १६

ऐरोली २५
दिघा २५