नवी मुंबई : शहरातील गणेशोत्सवात कोठेही ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाले नसल्याचा दावा, पोलिसांनी केला आहे. विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळाने ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडल्याचे आढळले नसल्याने कारवाईची गरज भासली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांकडे थेट तक्रार दाखल केलेली नसली तरी काही नागरिकांनी मोठ्या आवाजातील फटाके आणि ढोल-ताशांमुळे त्रास झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ध्वनिमर्यादा भंगाची ‘निरंक’ अशी केलेली नोंद आणि नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलेला ‘दणदणाट’ यातील नेमके वास्तव काय याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवी मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना ध्वनिमर्यादेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डीजे आणि मोठ्या आवाजातील ध्वनियंत्रणांचा वापर टाळण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशांचीही माहिती मंडळांना देण्यात आली होती. त्यानुसार विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीची पातळी तपासण्यासाठी ध्वनिमापक यंत्रांचा वापर केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विसर्जन मिरवणुकांदरम्यान करण्यात आलेल्या या तपासणीत निर्धारित डेसिबल मर्यादा ओलांडल्याचे कुठेही आढळले नाही. त्यामुळे कोणत्याही गणेशोत्सव मंडळाविरोधात ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दाखल झालेला नाही. नवी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा डीजेचा वापर टाळला. तसेच मोठ्या आवाजातील ढोल-ताशांचे वादन आणि फटाक्यांचा वापरही टाळण्यात आल्याने विसर्जन मिरवणुका शिस्तबद्ध आणि नियमांचे पालन करून पार पडल्याचा पोलिसांचा दावा आहे.
मात्र, काही नागरिकांनी पोलिसांच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातील विविध भागांत विसर्जनाच्या काळात मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात आल्याचे तसेच काही ठिकाणी ढोल-ताशांचा मोठा आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना या आवाजाचा त्रास झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. शहरातील एका प्रतिष्ठित संस्थेच्या सदस्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर ढोल-ताशांचा आवाज ८० डेसीबलपेक्षा अधिक असल्याचा दावा केला आहे. यामुळे त्यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामुळे ध्वनिमापक यंत्राच्या नोंदी आणि नागरिकांचा प्रत्यक्ष अनुभव यातील तफावत चर्चेचा विषय ठरली आहे.
नवी मुंबईतील पोलिसांच्या तपासणीची पद्धत आणि त्यातून नोंदविलेली कमाल ध्वनीपातळी याबाबतची आकडेवारी मात्र अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. कोणत्या विसर्जनस्थळी किती वेळ ध्वनीमापन करण्यात आले, त्या वेळी नोंदविलेली किमान आणि कमाल ध्वनीपातळी किती होती, तसेच फटाक्यांच्या आवाजाची स्वतंत्रपणे नोंद करण्यात आली का, याबाबत स्पष्टता आल्यास पोलिसांचा दावा आणि नागरिकांचे अनुभव यातील फरक समजण्यास मदत होणार आहे.दरम्यान, नवी मुंबईत यंदा अनेक गणेशोत्सव मंडळांनी डीजेचा वापर न करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांना कळविले होते. त्यामुळे डीजेमुळे होणारा कर्णकर्कश आवाज तुलनेने कमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, डीजेचा वापर टाळला असला तरी ढोल-ताशे आणि फटाक्यांमुळे निर्माण होणारा आवाज ध्वनीमर्यादेत होता का, हा प्रश्न नागरिकांच्या तक्रारींमुळे उपस्थित झाला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करताना केवळ गुन्हे दाखल झाले किंवा नाहीत, यापेक्षा प्रत्यक्ष ध्वनीपातळीची नोंद आणि त्याची पारदर्शक माहिती महत्त्वाची ठरते. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या ध्वनीमापनाची ठिकाणनिहाय आकडेवारी उपलब्ध झाल्यास यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषणाचे नियम प्रत्यक्षात कितपत पाळले गेले, याचे चित्र अधिक स्पष्ट होऊ शकणार आहे.
ठाण्यामध्ये गुन्हे दाखल
ठाणे शहरात ध्वनिप्रदूषणाच्या नियमभंगाबाबत पोलिसांनी कारवाई केली. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान ६९ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी ३६ गुन्हे ध्वनीमर्यादा ओलांडल्याप्रकरणी, तर ३३ गुन्हे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्याप्रकरणी दाखल झाले. ठाण्यातील काही प्रमुख विसर्जन मार्गांवर करण्यात आलेल्या ध्वनीमापनात ९५ ते १०० डेसिबलपर्यंत ध्वनीपातळी नोंदविल्याचेही समोर आले. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत एकही गुन्हा दाखल न होणे आणि ध्वनिमर्यादा भंग न आढळल्याचा पोलिसांचा दावा आश्चर्यकारक आणि हास्यास्पद असल्याचे ध्वनिप्रदूषणावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते रोहित जोशी यांनी म्हटले आहे.
ध्वनिमापक यंत्रांचा वापर करून डेसिबलची मर्यादा तपासण्यात आली. शहरात कुठेही निर्धारित मर्यादा ओलांडल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे कोणत्याही गणेशोत्सव मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नवी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नियमांचे पालन केले. – योगेश चव्हाण, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई
