नवी मुंबई : घणसोली सेक्टर ७ मधील सिम्प्लेक्स वसाहतीच्या पुनर्विकासासाठी प्रस्तावित नागरी नवीकरण योजना (यूआरएस) पुढे नेण्यास महापालिकेच्या महासभेने स्थगिती दिल्यानंतर सिम्प्लेक्समधील रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. वर्षानुवर्षे रखडलेल्या पुनर्विकासाला यूआरएसच्या माध्यमातून गती मिळण्याची अपेक्षा असताना महासभेतील निर्णयामुळे ती प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. क्लस्टरच्या माध्यमातूनच पुनर्विकास करावा, या मागणीसाठी रविवारी हजारो रहिवाशांनी आंदोलन करत महासभेतील निर्णयाचा निषेध केला.

सिम्प्लेक्स वसाहतीतील रहिवाशांचा पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. २००४-०५ मध्ये माथाडी आणि कष्टकरी वर्गासाठी उभारण्यात आलेल्या या वसाहतीत ३,१६८ सदनिका, ९६ दुकाने आणि सात सहकारी संस्था आहेत. सुमारे १८० चौरस फुटांच्या सदनिकांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना गळती, भिंतींना तडे तसेच स्लॅबचे तुकडे कोसळण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा यापूर्वीही महासभेत मांडण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्विकासाचा प्रश्न रहिवाशांसाठी केवळ घराचा नव्हे, तर सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे.

या पार्श्वभूमीवर सिम्प्लेक्सचा यूआरएसमध्ये (अर्बन रिन्युअल स्कीम) समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. महापालिकेने १४ जुलै रोजी काढलेल्या नागरी पुनरुत्थान आराखड्याच्या अधिसूचनेत घणसोली सेक्टर ७ मधील सिम्प्लेक्सचा क्लस्टर क्रमांक चारमध्ये समावेश करण्यात आला. सुमारे ६७ हजार १४६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या क्लस्टरसाठी सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुनर्विकासाची प्रक्रिया प्रत्यक्ष मार्गी लागण्याची अपेक्षा रहिवाशांना होती.

मात्र, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकामुळे (एफएसआय) नवी मुंबईतील पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि आरोग्य सुविधांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याची मागणी महासभेत करण्यात आली. वाढीव बांधकाम क्षमतेचा शहराच्या पायाभूत सुविधांवर दीर्घकाळ परिणाम होणार असल्याने वहनक्षमता तपासल्याशिवाय यूआरएसची पुढील कार्यवाही करू नये, अशी भूमिका सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी घेतली. त्यानंतर यूआरएसच्या पुढील कार्यवाहीला स्थगिती देण्यात आली.

महापालिकेच्या या भूमिकेमुळे सिम्प्लेक्समधील रहिवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पायाभूत सुविधांच्या क्षमतेचा अभ्यास करण्यास विरोध नसला तरी त्यासाठी पुनर्विकासच थांबवू नये, अशी रहिवाशांची भूमिका आहे. मोठी आणि सुरक्षित घरे मिळण्याची प्रक्रिया पुन्हा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडू नये, अशी मागणी करत रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी महासभेतील क्लस्टरविरोधी भूमिकेचा निषेध करण्यात आला.

दरम्यान, महासभेत यूआरएसच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नगरसेवक आमनेसामने आले होते. विकासकाच्या माध्यमातून होणाऱ्या पुनर्विकासाऐवजी स्वयंपुनर्विकास आणि महापालिकेच्या माध्यमातून शहरी पुनर्रचना करण्याची भूमिका भाजपकडून मांडण्यात आली. दुसरीकडे, सिम्प्लेक्समधील रहिवाशांची दुरवस्था लक्षात घेता यूआरएसच्या माध्यमातून पुनर्विकासाला चालना मिळणे आवश्यक असल्याचे मत शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नगरसेवकांनी मांडले.

यूआरएसमुळे मिळणाऱ्या वाढीव बांधकाम क्षमतेचा फायदा कोणाला आणि त्याचा शहराच्या पायाभूत सुविधांवर किती भार पडणार, हा महासभेतील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र, या राजकीय आणि धोरणात्मक वादात पुनर्विकासाची प्रतीक्षा करणाऱ्या सिम्प्लेक्सवासीयांचा प्रश्न मागे पडू नये, अशी भूमिका आता रहिवाशांनी घेतली आहे. त्यामुळे सिम्प्लेक्सच्या यूआरएसवरून सुरू झालेला वाद महासभेपुरता न राहता आता थेट रहिवाशांच्या आंदोलनापर्यंत पोहोचला आहे.