नवी मुंबई : पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘हरित प्रभाग’ अर्थात ‘ग्रीन वॉर्ड’ स्पर्धा राबविण्याची संकल्पना महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केली. प्रत्येक प्रभाग अधिकाधिक हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था, विविध मंडळे तसेच शाळा-महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे शनिवारी कोपरखैरणे सेक्टर १४ येथील निसर्गोद्यानात ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाच्या अनुषंगाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, महापालिका अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सध्याची पर्यावरणीय परिस्थिती पाहता पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाला पर्याय राहिलेला नाही. शहराचा विकास होत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ झाडे लावण्याऐवजी त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारणे गरजेचे आहे. नागरिकांना पर्यावरण संवर्धनाच्या कामात प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्रीन वॉर्ड’ स्पर्धेची संकल्पना मांडण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

प्रभागनिहाय पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देणे, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन वाढविणे तसेच नागरिक आणि विविध संस्थांचा सहभाग वाढविणे, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. शहरातील प्रत्येक प्रभागाने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सर्वांनी मिळून जागरूकतेने प्रयत्न करण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धन ही आपल्या अस्तित्वाची लढाई असून विकास हा पर्यावरणाची काळजी घेऊनच झाला पाहिजे, असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. नवी मुंबईत वृक्षलागवड करताना जैवविविधतेचा विचार करून देशी प्रजातींच्या झाडांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या पर्यावरणविषयक कामात सहकार्य करणाऱ्या विविध संस्था आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात विविध संस्थांनी दिलेल्या योगदानाबद्दल महापालिकेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

सुरंगीची लागवड

कर्नाटकातून आणलेल्या चार ते पाच फूट उंचीच्या सुरंगीच्या २०० रोपांची निसर्गोद्यानात लागवड करण्यात आली. सुरंगी हे मध्यम आकाराचे सदाहरित आणि सुगंधी फुलांचे झाड असून, त्याच्या फुलांचा अनोखा आकार आणि मोहक सुगंध यासाठी ते ओळखले जाते. त्यामुळे निसर्गोद्यानातील हा परिसर भविष्यात सुरंगीच्या सुगंधाने दरवळणार आहे.