नवी मुंबई: नवी मुंबईत एका सॉफ्टवेअर व वेबसाईट डेव्हलपमेंट व्यावसायिकता पी.टी .इ .सी आणि पीटीआरसी प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजाराची लाच मागणाऱ्या व्यवसाय कर अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्या सोबत खाजगी काम करणाऱ्या महिलेला हि ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने वस्तू आणि सेवा कर विभागात खळबळ उडाली आहे.
व्यवसाय कर अधिकारी अमित गिरी, आणि त्यांच्या कडे काम करणारी खाजगी महिला वैशाली कदम असे यातील संशयित आरोपींची नावे आहेत. यातील तक्रारदार यांचा नवी मुंबईत सॉफ्टवेअर व वेबसाईट डेव्हलपमेंट व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या अनुषंगाने जीएसटी ( वस्तू सेवा कर विभाग कोकण परिक्षेत्र बेलापूर येथून तक्रारदार यांना यातील व्यवसाय कर अधिकारी अमित गिरी यांची सही असलेली PTEC (व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र) आणि PTRC (कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापलेला व्यवसाय कर ) संदर्भात कारणे दाखवा नोटीस ईमेल द्वारे आली होती.
या नोटीस च्या अनुषंगाने तक्रारदार हे व्यवसाय कर अधिकारी गिरी यांना भेटण्याकरिता त्यांच्या कार्यालयात गेले असता त्यांनी त्यांच्या कार्यालयातील सहाय्यक वैशाली कदम यांना भेटण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्या कार्यालयातील वैशाली कदम यांनी तक्रारदार यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना २३ हजार ९०० रुपये इतकी रक्कम भरावी लागेल असे सांगितले. त्यातील १२ हजार ९०० रक्कम ची पावती उर्वरित १० हजार रुपये ही फाईल क्लोज करण्यासाठी गिरी यांना द्यावे लागतील असे सांगितले. हीच १० हजारची रक्कम शासकीय फी नसून लाच मागण्यात आली होती. याबाबत तक्रारदार यांनी २ एप्रिलला लाच लुचपत विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.तक्रारीची दखल घेत त्याची पडताळणी त्याच दिवशी करण्यात आली. तसेच अमित गिरी यांच्यासाठी १० हजार ऐवजी ७ हजार देण्याचा तडजोड अंती व्यवहार ठरला.
व्यवसाय कर अधिकारी यांच्या कार्यालयात रचला सापळा
६ एप्रिलला गिरी यांच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला. हा व्यवहार हा ७ हजार रुपयात ठरला असला तरीही खाजगी महिला नामे वैशाली कदम यांनी तक्रारदार यांना नोंदणी करून देण्यासाठी नव्याने अतिरिक्त २ हजार मागितल्या प्रमाणे तिला देण्यात आले. हि रक्कम खाजगी महिला वैशाली कदम यांना देण्यासाठी गिरी यांनी मागितली होती असे समोर आले. त्यानंतर गिरी यांनी मागितलेली ७ हजार रुपये देण्यासाठी तक्रारदार यांनी त्यांच्या कॅबिन मध्ये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. हि कारवाई सव्वा सहा वाजता पूर्ण करण्यात आली.
गिरी आणि वैशाली कदम यांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यात दोघांचे मोबाईल लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. तसेच दोघांच्याही घराची झडती काम अद्याप सुरु आहे. हि कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
