नवी मुंबई: मराठी महिन्याचा पहिला दिवस असणारा गुढीपाडवा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. नवी मुंबईत ठिकठिकाणी शोभा यात्रा, सर्वात उंच गुढी, छोट्यांच्या स्पर्धा असे आनंदी वातावरण असताना शहरातील हजारो शुभेच्छा फलकांनी मात्र पूर्ण शहर विद्रुप झाले आहे. यात जवळपास सर्वच फलक राजकीय नेत्यांच्या शुभेच्छाचे असून एकही राजकीय पक्षाच्या नेत्याने आपल्या फलकाने शहर विद्रुप होतेय अथवा फलकासाठी रीतसर परवानगी काढण्याचे सौजन्य दाखवल्याचे दिसून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे अतिक्रमण विभागही या अनधिकृत फलकांना हात घालण्याची हिम्मत दाखवताना दिसत नाही.

वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा! समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा! अशा प्रकारे अनेक शुभेच्छा एकमेकांना देत घरी सकाळी मुहूर्तावर गुढी उभारून पुरणपोळी कटाची आमटीवर ताव मारून तृप्त होण्याचा सण म्हणजे गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या या सणाच्या दिवशी नवी मुंबईत सर्वत्र शोभायात्रा असा अनेक उपक्रम साजरे होत असल्याने केवळ वयक्तिक वा कौटुंबिक सण न राहता एकत्रित पूर्ण शहर हा सण साजरा करते.

अशात घराबाहेर पडताच राजकीय नेत्यांचे अनधिकृत असणाऱ्या फलकाने शहराची रया गेल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य चौकात तर इंच इंच जागा लढू या प्रमाणे शुभेच्छा फलक लावण्यात आले आहे. नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनी झाली असल्याने नगरसेवक म्हणून अनेक नवीन चेहरे नेते म्हणून उदयास आले आहेत. त्यांनी स्वतःची प्रसिद्धी करताना अशाच फलकांचा सहारा घेत जागोजागी फलक लावले आहेत.

फलकांना जागा न मिळाल्याने आता रस्त्याच्या दुभाजकही पुरेना नेत्यांची संख्या एवढी उदंड झाली आहे की फलक लावण्यास जागाही मिळेना. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईत ऐन रस्ते दुभाजकात फलक लावण्याचा प्रकार सुरु झाला आहे. त्यात यंदा गुढीपाडवाही सुटला नाही. धक्कादायक बाब म्हणजे फलक लावताना दुभाजकात शहर सौंदर्यात भर घालणारे शिल्प आहे निदान ती जागा सोडून फलक लावले एवढेही तारतम्य बाळगले गेल्याचे दिसून येत नाही.

याबाबत यशवंत माने या जेष्ठ नागरिकाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, आज हे फलक काढण्याचे धाडस अतिक्रमण विभाग करणार नाही. गुढीपाडवा झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शहरातील फलक काढत अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई म्हणून मान उंच करतील.

याबाबत अतिक्रमण उपायुक्त डॉ. कैलास शिंदे यांना विचारणा केली असता लवकरात लवकर फलकांवर कारवाई करून काढून टाकण्यात येतील असे सांगितले.