सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; झाडांची पडझड, वीजपुरवठा खंडित

नवी मुंबई : अरबी समुद्रातून घोंघावत गुजरातच्या दिशेने निघालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका नवी मुंबई शहरासह पनवेल, उरण तालुक्याला बसला. सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्कालीन विभागाने दिली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा फटका घरून कार्यालयीन कामे करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना बसला.

नवी मुंबई शहरात पहाटे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि हवेत गारवा निर्माण झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरात बेलापूर ते दिघ्यापर्यंत सर्वच विभागांत झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी झाडे दुचाकी व चारचाकी वाहनावर पडून लाखोंचे नुकसान झाले आहे. ऐरोली व घणसोली येथे झाड चारचाकी वाहनावर पडून तर ऐरोली येथे झाड रिक्षावर पडून गाड्यांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या मदतीने उद्यान विभागही पडलेल्या झाडांच्या फांद्या कापून मार्गातील अडसर दूर करण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती उद्यान उपायुक्त मनोज महाले यांनी दिली.

पामबीच मार्ग परिसरातही सोसाट्याचा वारा वाहात होता. त्यामुळे पावसाची संततधार व सोसाट्याचा वारा यांमुळे या मार्गावरून चारचाकी तसेच दुचाकी वाहने चालवताना अडथळा येत होता. शहरात ताशी ६५ ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. सकाळपासूनच पालिकेचे अग्निशमन विभाग, आपत्कालीन विभाग, उद्यान विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

सीवूड्स सेक्टर ५० येथे एक विजेचा मनोरा पडला. परंतु तात्काळ वीजपुरवठा दुसऱ्या मनोऱ्यावर वर्ग करण्यात आला, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, तर अनेक भागांत सुरळीत होता, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

झाडे कोसळण्याचे प्रमाण कमी

मागील वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये शहरात मोठ्या प्रमाणात झाडे पडली होती. जवळजवळ ७५० झाडे नवी मुंबईत पडली होती. त्यामुळे दोन ते तीन दिवस पडलेली झाडे हटवण्यात गेली होती. परंतु तौक्ते वादळात मात्र नवी मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटना कमी झाल्या आहेत.

शहरात योग्य ती खबरदारी घेतली होती. सर्व विभागांतील अग्निशमन कर्मचाऱ्यांना सज्ज राहाण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे शहरात काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु तात्काळ कार्यवाही केली. निसर्ग वादळाच्या मानाने या वादळात झाडे कोसळण्याच्या घटना खूप कमी घडल्या. – शिरीष आरदवाड, उपायुक्त अग्निशमन विभाग