नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सध्या १५ ते २५ मिनिटे विलंबाने धावत असून वाशी, नेरूळ, सीबीडी बेलापूर, सीवूड्स, खारघर आणि पनवेल स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रेल्वे रुळांवरील प्रतिकूल परिस्थिती, कमी झालेली दृश्यमानता आणि काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लोकल सेवा मंदावली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर, उपनगरांसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक सखल भाग जलमय झाले. काही रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून रिक्षा आणि टॅक्सी सेवाही विस्कळीत झाली. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी रेल्वेचा पर्याय स्वीकारला; मात्र लोकल सेवेत झालेल्या विलंबामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी-बेलापूर लोकल सुमारे २५ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती प्रवाशांकडून मिळत आहे. मध्यरेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, चुनाभट्टी परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने काही गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. वडाळा-पनवेल मार्गावरील एका लोकलला काही काळ थांबावे लागल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच कुर्ला, वडाळा आणि चुनाभट्टीदरम्यान काही लोकल वारंवार थांबत असल्याने पनवेलकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास लांबला आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल लोकल सेवाही विलंबाने सुरू आहे. या मार्गावरील गाड्या सरासरी १५ मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक उशिराने धावत असल्याने वाशी, नेरूळ आणि पनवेल स्थानकांवर गर्दी वाढली आहे. काही प्रवाशांनी सेवा सुरू असल्याचे सांगितले असले, तरी वेळापत्रक विस्कळीत झाल्याने नियमित प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विक्रोळी परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने तेथे वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सीएसएमटी-कल्याण, कर्जत आणि खोपोली मार्गावरील लोकल सेवाही मंदावली असून त्याचा परिणाम हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवांवरही होत आहे.पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने लोकल सेवेतील विलंब काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
