नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत सरासरी २१०.७६ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे मोरबे धरणातील जलसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे, बेलापूरच्या शहाबाज गावातील एका इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळल्याने १७ सदनिकांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करावे लागले. मात्र, २०० मिमीहून अधिक पाऊस होऊनही शहरातील जनजीवन बहुतांश सुरळीत राहिले. मॅफ्को चौक, ऐरोली टी-जंक्शन आणि एपीएमसी परिसरातील काही मोजक्या ठिकाणीच पाणी साचल्याची नोंद झाली.

४ जुलै रोजी सकाळी ८.३० ते ५ जुलै रोजी सकाळी ८.३० या कालावधीत बेलापूरमध्ये सर्वाधिक ३०२.७८ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल ऐरोलीमध्ये २४७.६० मिमी, दिघ्यात २२१.२० मिमी, कोपरखैरणेमध्ये १९९.२० मिमी, नेरुळमध्ये १५२ मिमी आणि वाशीत १४१.८० मिमी पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत शहरात १,०२०.२२ मिमी पाऊस झाला आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नोंदीनुसार या कालावधीत शहरात २५ ठिकाणी झाडे कोसळली, सात ठिकाणी पाणी साचले, एका ठिकाणी झाडाची फांदी पडली, एका ठिकाणी आग लागली आणि एका ठिकाणी स्लॅब कोसळण्याची घटना घडली. सर्व घटनांवर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागाने तातडीने प्रतिसाद देत आवश्यक उपाययोजना केल्याचे महापालिकेने प्रशासनाने सांगितले.

मोरबे धरणातील जलसाठ्यात वाढ; धरण ३३.९६ टक्के भरले

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यावर दिसून येत आहे. धरण परिसरात गेल्या २४ तासांत २७०.२० मिमी पावसाची नोंद झाली असून १ जूनपासून आतापर्यंत ८७१.४० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाची जलपातळी ७२.१५ मीटरपर्यंत पोहोचली असून सध्या धरणात ३३.९६ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. जुलैच्या सुरुवातीलाच जलसाठ्यात झालेली ही वाढ नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलासादायक मानली जात आहे. मात्र, समाधानकारक साठ्यासाठी आगामी काळातही सातत्याने पावसाची आवश्यकता असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

शहाबाज गावातील स्लॅब दुर्घटनेनंतर १७ सदनिकांतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले.बेलापूर सेक्टर १९ येथील शहाबाज गावातील अविघ्न को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पाच मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीचा स्लॅब शनिवारी रात्री अचानक कोसळला. माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत इमारतीतील १७ सदनिकांमधील सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

प्रशासनाच्या माहितीनुसार, रेस्क्यू वाहनावरील ध्वनिक्षेपकाद्वारे वारंवार सूचना देऊन इमारतीत कोणी अडकलेले नाही, याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर महावितरणकडून इमारतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. काही रहिवाशांची महापालिकेच्या परिवहन बसमधून वारकरी भवन येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली, तर काही जण नातेवाईकांकडे गेले. सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीच्या दोन्ही प्रवेशद्वारांना कुलूप लावून प्रवेश बंद करण्यात आला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.