नवी मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई महानगर प्रदेशासह ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सर्व अंगणवाडी, बालवाडी तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळा दिवसभर बंद राहणार आहेत.
ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रविवारी संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश दिला. त्या आदेशाच्या अनुषंगाने आणि महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील सर्व शाळांमध्येही सुट्टी लागू केली. महापालिकेच्या शिक्षण विभागाने यासंदर्भातील आदेश सर्व संबंधित शाळांना पाठवून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला असून हवामान विभागाने सोमवारीही मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. फ्लॅश फ्लड गाईडन्स बुलेटिनमध्येही पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
महापालिकेने सर्व शाळा प्रशासनांना पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुट्टीबाबतची माहिती तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक बाहेर पडणे टाळावे तसेच सखल भाग, नदी, नाले आणि खाडी परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
