नवी मुंबई : नवी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (३ जुलै) दुपारच्या सत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सकाळचे आणि सर्वसाधारण सत्र सुरू असलेल्या शाळांना विद्यार्थ्यांना तातडीने पालक किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या ताब्यात सुरक्षितपणे सोडण्याचे निर्देशही प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचणे, वाहतुकीचा वेग मंदावणे आणि पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शाळांनी पालकांना तात्काळ सूचना करून विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या घरी रवाना करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि परिसरात पुढील काही तासांत मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्याचा तसेच भरतीच्या काळात सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठ ते शुक्रवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत शहरात सरासरी १०३.५३ मिमी पावसाची नोंद झाली. दिघा येथे सर्वाधिक १२९.२० मिमी, तर बेलापूरमध्ये १२८ मिमी पाऊस झाला. कोपरखैरणेत १०६.४० मिमी, ऐरोलीत १०३.८० मिमी, नेरुळमध्ये ७७.२० मिमी आणि वाशीत ७६.६० मिमी पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत शहरात एकूण ७२८.३७ मिमी पाऊस झाला आहे.

दुपारी ४.२८ मीटर उंचीची भरती असल्याने सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.