नवी मुंबई : पावसाळ्यापूर्वी शहरातील सात हजारांहून अधिक झाडांच्या शास्त्रीय छाटणीचा आणि धोकादायक झाडे हटविल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरत आहे. मागील आठवडाभरात शहराच्या विविध भागांत तब्बल १३७ झाडे उन्मळून पडले आहेत. त्यातच सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० या अवघ्या आठ तासांच्या कालावधीत आणखी ४७ झाडे आणि काही मोठ्या फांद्या कोसळल्याची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली. विशेषतः वाशी परिसरात सलग घडलेल्या दुर्घटनांमुळे महापालिकेच्या वृक्षछाटणी मोहिमेच्या परिणामकारकतेवर आणि पावसाळापूर्व कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबवून शहरातील ७ हजार ३६ झाडांची छाटणी केल्याचा दावा प्रसिद्ध केला होता. तसेच १०४ अतिधोकादायक झाडांवर वेळेत कारवाई करून ती हटविल्याचे सांगितले होते. मात्र, मुसळधार पावसाच्या पहिल्याच टप्प्यात झाडे आणि महाकाय फांद्या कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. महापालिकेचा वृक्षछाटणीचा दावा केवळ कागदावरच होता की काय, अशी शंका आता नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, सध्याच्या स्थितीवरून शहरातील झाडांची सुरक्षितता, पावसाळापूर्व नियोजनाची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील दरी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली. पावसाच्या पार्श्वभूमीवर दररोज वाढणाऱ्या झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. महापालिकेकडून आपत्कालीन छाटणी आणि दुरुस्तीची कामे सुरू असली तरी, प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना पुरेशी ठरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाशीमध्ये सर्वाधिक फटका
गेल्या काही दिवसांत वाशी परिसराला झाडे कोसळण्याचा सर्वाधिक फटका बसला. वाशीतील सेक्टर २९ मध्ये दोन मोठी झाडे कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर सेक्टर १५ येथे एका चालत्या रिक्षावर अचानक मोठी फांदी कोसळली, सुदैवाने रिक्षाचालक यातून थोडक्यात बचावला. वाशीतीलच सेक्टर १६ मधील एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षा भिंतीवर झाड पडल्याने भिंत कोसळली तर एका चारचाकीचे नुकसान झाले. या सलग दुर्घटनांनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धोकादायक फांद्यांची वेळेत छाटणी झाली असती, तर ही जीवित व वित्तहानी टाळता आली असती, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
झाडांचे आयुषमान संपले
नवी मुंबई हे सुनियोजित शहर म्हणून विकसित करताना, सिडकोने सुरुवातीच्या काळात शहरात वेगाने वाढणाऱ्या वृक्षांची लागवड केली होती. मात्र, या झाडांचे आयुषमान साधारण २५ ते ४० वर्षांचेच असते.सिडकोकालीन झाडांना ४० हून अधिक वर्षे पूर्ण झाली असून त्यांचे आयुषमान संपुष्टात आल्याचे शिवसेना (शिंदे) नगरसेवक शिवराम पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे जुन्या झाडांच्या जागी १०० वर्षे टिकणारी भारतीय झाडे लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेने या झाडांचे तातडीने ‘संरचनात्मक लेखापरीक्षण’ करणे गरजेचे असल्याचे मत भाजप नगरसेविका अंजली वाळुंज यांनी मांडले आहे.प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे आणि अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे निष्पाप नागरिकांच्या जीविताला तसेच मालमत्तेला धोका निर्माण झाला असून, याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेचे नियमांकडे बोट
नागरिकांचा रोष आणि वाढत्या दुर्घटनांवर स्पष्टीकरण देताना महापालिकेच्या उद्यान विभागाने मात्र बचावात्मक भूमिका घेतली आहे.उद्यान विभागातर्फे माहिती देताना उद्यान सहाय्यक गणेश देशमुख यांनी, यंदा तीव्र उन्हाळ्यामुळे अनेक भागांतील स्थानिक रहिवाशांनी उन्हाळ्यात वृक्षछाटणी करण्यास विरोध दर्शवला होता, ज्यामुळे नियोजित वेळेत मोहीम राबवता आली नसल्याचे म्हटले आहे.
याशिवाय, विद्यमान नियमांनुसार झाडांचे शेंडे छाटण्यास कायदेशीर मर्यादा असल्याने केवळ बाजूच्या फांद्यांची छाटणी केली जाते. यामुळे झाडांची उंची वाढून ती एका बाजूला झुकतात आणि असंतुलित होतात.तसेच शहरातील मुख्य रस्ते आणि पदपथांवर झालेल्या अति-काँक्रीटीकरणामुळे झाडांच्या मुळांना ऑक्सिजन व पाणी मिळत नसल्याने ती कमकुवत झाली आहेत.
नवी मुंबईची खारट जमीन आणि मुसळधार पावसासोबत वाहणारे वादळी वारे यामुळे ही झाडे उन्मळून पडत असल्याचे उद्यान विभागाने स्पष्ट केले.सध्या भर पावसातही आपत्कालीन छाटणी सुरू असून, उर्वरित काम जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
